Ratnagiri: कर्दे समुद्रकिनारी स्टंटबाजी आली पुण्यातील पर्यटकांच्या अंगाशी, नियंत्रण सुटल्याने कार उलटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 17:51 IST2025-09-13T17:50:23+5:302025-09-13T17:51:30+5:30
गाडीतील काहीजण बाहेर फेकले गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनारी स्टंटबाजी आली पुण्यातील पर्यटकांच्या अंगाशी, नियंत्रण सुटल्याने कार उलटली
दापोली (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी पर्यटकांचा बेफामपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. समुद्रकिनारी सुसाट वेगाने गाडी पळवून स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. हा प्रकार गुरुवारी (दि. ११) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमाराला घडला. ही गाडी पुणे येथील पर्यटकांची असून, सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झालेली नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक कुटुंबासह फिरण्यासाठी आलेले असताना गुरुवारी सायंकाळी एक थार (क्र. एमएच १२, एक्सटी १७८८) गाडी भरधाव वेगाने समुद्रकिनाऱ्यावरून धावत हाेती. या गाडीचा वेग इतका भयानक हाेता की, गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी किनाऱ्यावर उलटली. या गाडीतील काहीजण बाहेर फेकले गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र या प्रकारामुळे किनाऱ्यावरील पर्यटकांच्या अंगाचा थरकाप उडाला हाेता.
या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी पाेहाेचून जेसीबीच्या साहाय्याने गाडी किनाऱ्यावर आणली. मात्र, या प्रकारामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून, स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सूचना देऊनही पर्यटकांचे दुर्लक्ष
दापाेली तालुक्यातील कर्दे, हर्णै आणि आसपासच्या किनाऱ्यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, काही बेपर्वा पर्यटक नियमांचे उल्लंघन करून गाड्या समुद्रकिनारी आणतात आणि धोकादायक स्टंट करतात. यामुळे अपघातांची शक्यता वाढते. या आधीही अशा घटना घडल्या असून, वारंवार सूचना देऊनही काही पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
कडक कारवाईची गरज
पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी आणि अशा बेपर्वा वर्तनावर आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी हाेत आहे. तसेच किनाऱ्यावर सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.