रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:29 IST2025-08-05T15:29:10+5:302025-08-05T15:29:23+5:30
याबाबत शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या

रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक
रत्नागिरी : शहराच्या तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दुकानमालक गोविंद दिनेश गजरा याला अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शाळकरी मुलांमध्ये कायद्याने प्रतिबंधित असलेल्या ई-सिगारेटच्या सेवनाचे प्रमाण वाढले होते. अनेकदा मुलांच्या दप्तरांमध्येही त्या सापडत होत्या. याबाबत शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी ई-सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले.
सोमवारी (दि.४) या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअरमध्ये ई-सिगारेटची विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. या छाप्यात १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९ कलम ७ व ८ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त अधीक्षक बाबूराव महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर आणि पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलिस फाैजदार दीपक साळवी, हवालदार अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, प्रशांत पाटील, सोनल शिवलकर आणि कॉन्स्टेबल अमित पालवे, मोहिनी चिनके यांचा समावेश होता.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शाळा-कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ नुसार कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आणि शिक्षकांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारची उत्पादने विक्री किंवा सेवन करताना आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.