रत्नागिरी : जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५६ टक्के झाली आहे. तर दुसरा डोस ८३१८ जणांनी घेतला आहे. जिल्ह्याला ज्या प्रमाणात डोस उपलब्ध झाले आहेत, त्या तुलनेने अजूनही लसीकरणासाठी लोक पुढे येत नसल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत हळूहळू वाढ होत आहे.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स तसेच कर्मचारी यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर पहिल्या फळीतील कोरोना योद्धे महसूल आणि पोलीस कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच कोमाॅर्बिड (सहव्याधी) असलेल्या व्यक्तींनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच सात खासगी रुग्णालये यांसह एकूण ६१ केंद्रांवर लसीकरण होत आहे.
आतापर्यंत जिल्ह्याला कोरोना लसीचे ८५,१३० डोस प्राप्त झाले असून त्यापैकी ५९,४०४ डोसचे वाटप सर्व तालुक्यांतील केंद्रांना करण्यात आले आहे. तर २५,६४० डोस अजूनही शिल्लक आहेत.
आरोग्य विभागाकडून लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता ऑनलाईन नोंदणी करण्याबरोबरच नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जावून नोंदणी करून लस घेता येते. मात्र, अजूनही काही शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी लस घेण्यात मागे राहत असल्याचे दिसते. तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींकडूनही कोरोना लस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद लाभत आहे. त्या तुलनेने ज्येष्ठ नागरिकांचा टक्का वाढलेला दिसतो.
१८ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी तसेच पहिल्या फळीतील कोरोनाशी लढा देणारे महसूल, पोलीस तसेच शासकीय कर्मचारी यापैकी २०,०७२ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. तर ज्येष्ठ नागरिकांपैकी ९,०२३ जणांनी लसीकरण केले आहे. सहव्याधी असलेले केवळ १९२० लोक लसीकरणासाठी पुढे आले आहेत.
आतापर्यंत एकूण ३१०४२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस ८३१८ जणांनी पूर्ण केला आहे. जिल्ह्याला ज्या प्रमाणात डोस उपलब्ध झाले आहेत, त्या तुलनेने अजूनही लसीकरणासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याने लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.