परशुराम घाट दीड तास ठप्प, कंटेनर अडकल्याने वाहनांची मोठी रांग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 10:00 IST2021-11-19T09:55:22+5:302021-11-19T10:00:13+5:30
कंटेनर अडकल्याने दोन्ही बाजूंनी वाहने अडकली, महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग

परशुराम घाट दीड तास ठप्प, कंटेनर अडकल्याने वाहनांची मोठी रांग
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एका अवघड वळणावर कंटेनर अडकल्याने महामार्गावर दोन्ही बाजूनी अनेक वाहने अडकून पडली आहेत. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून दीड तास ही वाहने अडकून असून त्यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांचे कर्मचारी देखील अडकले आहेत. या महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारा हा कंटेनर पश्चिम घाटातील विसावा पॉइंट येथे गेल्यानंतर एका वळणावर अडकला. त्यानंतर तो कंटेनर एका बाजूला घेण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या प्रयत्नात कंटेनर संपूर्ण रस्त्यात आडवला आहे.
कंटेनरने पूर्ण रस्ता व्यापला असल्याने अन्य वाहनांचा मार्ग पूर्णता बंद झाला आहे. त्यामुळे या कँटीनच्या दोन्ही बाजूला अनेक वाहने अडकून पडली आहेत. त्यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीतील सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या व कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसही अडकून पडल्या आहेत. मुळात परशुराम घाटात मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम बंद आहे. तसेच रस्त्याचा काही भाग खचला असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक केली जात आहे. त्यातच आता वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी वाहतूक शाखेची पोलिस यंत्रणा पोहोचली असून क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.