रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:52 IST2024-08-26T15:51:22+5:302024-08-26T15:52:07+5:30
हवेमध्ये कमालीचा गारवा, नागरिकांना दिलासा

रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार काेसळणाऱ्या पावसाचा जाेर रविवारी सकाळपासूनच कमी झाला हाेता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला हाेता. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७०.१३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला असला तरी हवामान खात्याने साेमवारी व मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.
गेल्या पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरुवात केली आहे. मुसळधार काेसळणाऱ्या पावसाची दाेन दिवस संततधार सुरु हाेती. हवामान खात्याने २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, रविवारी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला हाेता. मात्र, रविवारी सकाळपासूनच मुसळधार काेसळणाऱ्या पावसाचा जाेर ओसरला हाेता. सकाळी एखादी सर काेसळल्यानंतर दुपारी पावसाचा जाेर वाढला हाेता. मात्र, काही वेळातच हा जाेर कमी झाला. सरीवर काेसळणाऱ्या पावसामुळे हवेमध्ये मात्र कमालीचा गारवा आला हाेता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला हाेता.
हवामान खात्याने साेमवारी व मंगळवारी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असून, जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.