मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:23 IST2025-07-25T17:23:24+5:302025-07-25T17:23:54+5:30

माती घसरण्याच्या प्रकारामुळे घाटातील प्रवासाची वाहनचालकांच्या मनातील भिती कायम

One way traffic again at Parshuram Ghat on Mumbai Goa highway Work halted due to rain | मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक

चिपळूण : तीन दिवस जोरदार पावसाने आपला मुक्काम कायम ठेवला असल्याने मुंबई - गोवामहामार्गावरील परशुराम घाटातील धोका आणखी वाढला आहे. यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पूर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय गॅबियन वॉलचा भराव वाहून जात असल्याने तेथे प्लॅस्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे. परंतु वाढत्या पावसामुळे दुरुस्तीच्या उपाययोजना करण्यात अडथळा येत असून, पावसाचा जोर कमी होताच दुरुस्ती केली जाणार आहे.

परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची संरक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक केली जात आहे.

खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारली जात होती. तसेच पायथ्यालगत डबर व सिमेंटने मजबुतीकरण केले जात होते. हे काम सुरू असताना मे महिन्यात पहिल्याच पावसात नव्याने उभारलेली गॅबियन वॉल खचली. त्यानंतर काही दिवसातच या गॅबियन वॉलचा काही भाग भरावासह वाहून गेल्याने या मार्गावरील धोका आणखी वाढला.

अवजड वाहतुकीचा भार

या घाटातील दरडीकडील मार्ग अतिशय धोकादायक बनल्याने याठिकाणी बॅरिकेटस उभारून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे काही वेळा याठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकारही घडत आहेत. विशेषतः अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत जास्त भर पडत आहे. अतिवृष्टीच्या वेळी अवजड वाहतूक सकाळ व संध्याकाळच्या सत्रात बंद ठेवावी, अशी मागणी होत आहे.

कृत्रिम धबधब्याचीही भीती

परशुराम घाटाच्या मध्यवर्ती भागात पावसाळ्यात पाण्याचे ओहळ वाहून येतात. त्याठिकाणी काँक्रिटीकरणाद्वारे पायऱ्यांसारखे टप्पे तयार करून तो भाग सुरक्षित केला आहे. त्याठिकाणी कृत्रिम धबधब्यासारखा भाग तयार झाला असून, पावसाळ्यात तो धबधबा प्रवाशांना तितकाच खुणावतो आहे. मात्र परशुराम घाटातील धोकादायक स्थितीमुळे या कृत्रिम धबधब्याचीही भीती प्रवाशांना जाणवत आहे.

परशुराम घाटात पावसामुळे गॅबियन वॉलच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या कामाला चालना मिळेल. घाटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत. स्टेपिंग पद्धतीने पाण्याचा निचरा झाल्यानंतर भराव, अथवा दरडी घसरण्याचे प्रकार घडणार नाहीत. - पंकज गोसावी, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

Web Title: One way traffic again at Parshuram Ghat on Mumbai Goa highway Work halted due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.