Ratnagiri: देवदर्शनाला निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, कारच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला
By मनोज मुळ्ये | Updated: June 16, 2023 18:44 IST2023-06-16T18:42:45+5:302023-06-16T18:44:35+5:30
संताेष पाेटफाेडे साखरपा : गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नीसह जात असताना चारचाकी गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश महादेव ...

Ratnagiri: देवदर्शनाला निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, कारच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला
संताेष पाेटफाेडे
साखरपा : गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नीसह जात असताना चारचाकी गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश महादेव शेटकर (३८, रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (१६ जून) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील काेंडगाव (ता. संगमेश्वर) येथील शिंदेवाडी येथे झाला.
दुचाकीस्वार गणेश शेटकर हे ज्युपिटर ही दुचाकी (जीए ११, जे ३२६७) गोव्यावरून कोल्हापूर मार्गे गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नी सुमित्रा गणेश शेटकर (३७) हिच्यासाेबत जात हाेते. रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव शिंदेवाडीजवळ दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या चारचाकी गाडी (एमएच ११, इइ ३०३३)ची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, दुचाकीस्वार गणेश शेटकर दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुमित्रा शेटकर या गंभीर जखमी झाल्या आहेत.
सुमित्रा शेटकर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अधिक उपचारासाठी पुढे हलविण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांनी मदत केली. साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलिस नाईक वैभव कांबळे, तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले. या अपघाताची नाेंद देवरूख पाेलिस स्थानकात करण्यात आली आहे.