झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:28 IST2022-05-13T14:27:49+5:302022-05-13T14:28:36+5:30
सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही.

झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात
खेड : मुंबईतून लांजा येथील गावी येत असताना चालकाला झोप अनावर झाली आणि कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता उधळे (ता. खेड) येथे झाला. गणपत नारायण नामे (वय-७५) असे मृत्यू वृद्धाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, संजय गणपत नामे (४३) हे कारने मुंबईतील मालाड येथून आपल्या लांजा तालुक्यातील पालू गावी येत होते. त्यांच्यासोबत वडील गणपत नामे, संतोष गणपत नामे (४५), अंजना संतोष नामे (३८), संचित संतोष नामे (८), श्रीवल्ली संदीप नामे (८) हे प्रवास करत होते. खेड तालुक्यातील उधळे दरम्यान गाडी आली असता चालक संजय नामे याला झोप अनावर झाली. त्यामुळे कारवरील ताबा सुटून कार महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन उलटली.
या अपघातात वडील गणपत नामे यांना जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक संजय नामे, संताेष नामे, अंजना नामे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी समेळ सुर्वे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खेड पोलीसही अपघातस्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढून तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.