चिपळूण (जि. रत्नागिरी) : कट रचून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून सावर्डे (ता. चिपळूण) येथील एकाची तब्बल ९८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर यापुढे लग्नाचा हट्ट केल्यास अतिप्रसंगाची तक्रार दाखल करण्याची धमकीही दिली आहे.ही घटना दि. १३ सप्टेंबर २०४ पर्यंत सावर्डे परिसरात घडली. याप्रकरणी प्रसाद रमेश पाकळे यांनी सावर्डे पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,तीन महिला व विश्वनाथ अर्जुन नलावडे (सध्या रा. कळंबोली, ता. पनवेल, मूळ रा. पालवण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिलांपैकी एकीने प्रमोद पाकळे यांच्याशी जवळीक साधली व त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपये घेतले. चाैघांनी संगनमताने कट रचून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करत तब्बल ९८ लाख १८ हजारांची फसवणूक केली.या प्रकरणातील पहिल्या महिलेने ‘ पुन्हा लग्नाचा हट्ट धरू नकोस. तुझ्यावर पोलिसांत केस दाखल करेन, आता आमच्याकडे येऊ नको,’ अशी धमकी दिली. इतकेच नाही तर सर्वांनी शिवीगाळ करून, तुला संपवून टाकू, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाकळे यांनी पोलिस स्थानकात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
Ratnagiri: लग्नाचे आमिष दाखवून एकाची ९८ लाखांची फसवणूक; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:03 IST