खवले मांजराची तस्करी करणाऱ्या एकास अटक, देवरुख पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:29 IST2022-04-25T19:28:33+5:302022-04-25T19:29:19+5:30
देवरुख: दुर्मिळ जातीच्या खवले मांजराची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला देवरुख पोलिसांनी देवळे फाटा देवालय या ठिकाणी सापळा ...

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या एकास अटक, देवरुख पोलिसांची कारवाई
देवरुख: दुर्मिळ जातीच्या खवले मांजराची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला देवरुख पोलिसांनी देवळे फाटा देवालय या ठिकाणी सापळा लावून पकडले. संशयित आरोपी ललित सतीश सावंत (वय-२५, सद्या रा. पालघर, मूळ गाव मेघी पवारवाडी ता. संगमेश्वर) असे त्याचे नाव आहे. याला आज, सोमवारी मुद्देमालासह अटक करुन देवरुख न्यायालायत हजर केले असता शुक्रवार (दि.२९) पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
देवरुख पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ललित हा देवळे दरम्यान येणार असल्याची माहिती देवरुख पोलिसांना मिळाली. यानुसार देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन भुजबळराव, संतोष सडकर, रोहित यादव, ज्ञानेश्वर मांडरे, रीलेश कांबळे यांनी सापळा रचला. काल, रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास देवळे फाटा रस्त्यावर देवालय येथील प्रवेशद्वारासमोर ललित दिसून आला.
यावेळी पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या पोतलीत (पिशवीची) तपासणी केली. यावेळी यात दुर्मिळ जातीचे खवले मांजर आढळून आले. याप्रकरणी ललीतवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४८(अ) आणि ५१ नुसार देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला देवरुख न्यायालायत हजर केले असता शुक्रवार (दि.२९) पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत. खवले मांजराला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.