Ratnagiri: दाभाेळ समुद्रकिनारी कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:25 IST2026-03-18T16:25:20+5:302026-03-18T16:25:44+5:30
संवर्धन माेहिमेला बळकटी

Ratnagiri: दाभाेळ समुद्रकिनारी कासवांची पिल्ले झेपावली समुद्रात
दापोली (जि. रत्नागिरी) : दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या शेकडो पिल्लांना समुद्राच्या पाण्यात साेडण्यात आले. १४ घरट्यांमधील तब्बल ९०६ पिल्लांनी समुद्राच्या दिशेने झेप घेतली.
ऑलिव्ह रिडले कासवाची प्रजात नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या कासवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने पावले उचलली आहेत. ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी काेकणातील समुद्रकिनारी येतात. ही अंडी वन्यप्राण्यांकडून किंवा अन्य प्रकारे नष्ट हाेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे समुद्रकिनारी सापडलेली अंडी संरक्षित करण्यात येत आहेत त्यानुसार, दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या १४ घरट्यांपैकी ९ घरट्यांतून ४०९ पिल्ले नैसर्गिकरीत्या बाहेर पडली. तसेच उर्वरित ५ घरट्यांमधील ४९७, अशी एकूण ९०६ पिल्लांना समुद्राच्या पाण्यात साेडण्यात आले.
स्वच्छ किनारा, अनुकूल वातावरण आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर कासवांसाठी सुरक्षित अधिवास ठरत आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढत असून, भविष्यात कासवांची संख्या वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संवर्धन माेहिमेला बळकटी
समुद्रकिनाऱ्यावर आढळणारी कासवांची अंडी हॅचरिजमध्ये संरक्षित करण्यात येतात. त्यातून बाहेर पडणारी पिल्लं पुन्हा समुद्रात सोडून त्यांचे संवर्धन केले जात आहे. यामुळे कासवांच्या जीवितदरात वाढ होत असून, संवर्धन मोहिमेला मोठी बळकटी मिळत आहे.