अधिकाऱ्याने अधिकाऱ्याकडेच मागितली लाच, तिघांना रंगेहाथ पकडले; रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:09 IST2025-09-13T18:07:52+5:302025-09-13T18:09:15+5:30
अंतिम अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी

अधिकाऱ्याने अधिकाऱ्याकडेच मागितली लाच, तिघांना रंगेहाथ पकडले; रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई
रत्नागिरी : लेखा परीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी एका अधिकाऱ्याकडे १६,५०० रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार रत्नागिरीत समाेर आला आहे. ही लाच स्वीकारताना स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील सहायक संचालकासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहायक संचालक शरद रघुनाथ जाधव (वय ५३), जिल्हा परिषद वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये (वय ४५) आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी (वय ३८) अशी कारवाई करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दापोली पंचायत समितीच्या सहायक लेखा अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती.
त्यानुसार, त्यांच्या कार्यालयाचे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण रत्नागिरीतील स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयामार्फत करण्यात आले होते. या अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपाल अहवाल सादर केला होता. हा अहवाल अंतिम करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी सहायक संचालक आणि कंत्राटी शिपाई यांची भेट घेतली. त्यावेळी २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी सहायक संचालकांच्या वतीने शिपायाने तक्रारदाराकडे २४ हजारांच्या लाचेची मागणी केली हाेती.
या लाच मागणीविरोधात तक्रारदाराने ११ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रार दिली हाेती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहायक संचालकांच्या संमतीने कंत्राटी शिपायाने तक्रारदाराकडून १६,५०० रुपयांची लाच स्वीकारून ती रक्कम तत्काळ जिल्हा परिषदेचे सहायक लेखा अधिकारी यांच्याकडे दिली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.
ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास रोकडे, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पोलिस फौजदार उदय चांदणे, पोलिस हवालदार विशाल नलावडे, संजय वाघाटे, दीपक आंबेकर, पोलिस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली.
सत्यता पडताळली अन् सापळा रचला
लाचलुचपत विभागाने तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर लेखा परीक्षण अहवालामधील प्रलंबित असलेल्या २१ मुद्द्यांपैकी १५ मुद्दे वळगून तसा अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडे तडजोडीअंती १६,५०० रुपयांची लाच घेण्याचे ठरल्याचे पुढे आले हाेते. गुरुवारी सायंकाळी ७:४६ वाजण्याच्या सुमाराला स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.