October is also the rainy month | आता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिना, शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे नुकसान

आता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिना, शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे नुकसान

ठळक मुद्देआता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिनायंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला आणि शेवटीही नुकसान

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम लांबत असून, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांप्रमाणेच ऑक्टोबर महिनाही पावसाचा महिना ठरू लागला आहे. अलिकडच्या काळात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. ऑक्टोबर महिन्यात काही दिवस मुसळधार पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी झालेली नाही.

कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे आहेत. जून आणि जुलैमध्ये मुसळधार, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हलक्या सरी, असे कोकणातील पावसाचे वेळापत्रक असते. जून महिन्यात सरासरी ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलैमध्ये १२८६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी केवळ ७०७ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच जुुलैमध्ये केवळ ५५ टक्केच पाऊस झाला. २०१९ आणि २०२० सालच्या या दोन्ही महिन्यांनी निराशाच केली.

ऑगस्ट महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. सप्टेंबर महिन्यात पावसाची परती सुरू होते. मात्र, गेल्या दोन वर्षात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस होत असून पावसाचा मुक्काम ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबत आहे.

जानेवारी २०१९ पासून वर्षभरच समुद्रात विविध वादळे येत होती. ऑगस्ट महिन्यात आलेल्या क्यार वादळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे अतोनात नुकसान केले होते. यावर्षीही ऑक्टोबर महिन्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, अजूनही जिल्ह्यात अतिवृष्टी वा ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात १ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत १२५१ मिलिमीटर (सरासरी १३९ मिलिमीटर) पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

यावर्षी केवळ ७८.५६ टक्के

यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पावसाने निराशा केली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सातत्य दाखवले असले तरी पावसाच्या चार महिन्यांच्या कालावधीत होणारा सरासरी पाऊस यावर्षी केवळ ७८.५६ टक्के (सरासरी २६४२.८४ टक्के) इतकाच झाला आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.

Web Title: October is also the rainy month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.