आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:00 IST2025-03-28T18:00:35+5:302025-03-28T18:00:35+5:30

रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचांनी डांबर वाहतूक करणारे ‘एमव्ही बीटू रिव्हर’ हे जहाज हायजॅक केले आहे. या ...

Nigerian pirates hijack ship off African coast take ten hostages including two from Ratnagiri | आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले 

आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले 

रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचांनी डांबर वाहतूक करणारे ‘एमव्ही बीटू रिव्हर’ हे जहाज हायजॅक केले आहे. या जहाजावरील दहा जणांना त्यांनी ओलिस ठेवले असून, यामध्ये रत्नागिरीतील दाेघांचा समावेश आहे. गेले अकरा दिवस उलटूनही त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने आपली मुले सुरक्षित आहेत का, अशी चिंता त्यांच्या पालकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्यांना साेडविण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रत्नागिरीतील कॅप्टन फैरोज मजगावकर, जावेद मिरकर, सहल कर्लेकर, शब्बीर सोलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराबाबत माहिती दिली. समीन जावेद मिरकर (रा. भाटकरवाडा, रत्नागिरी) आणि रिहान शब्बीर सोलकर (रा. कर्ला, रत्नागिरी) अशी ओलिस ठेवलेल्या रत्नागिरीतील दाेघांची नावे आहेत.

त्यांच्या पालकांनी सांगितले की, एमव्ही बीटू रिव्हर हे डांबर वाहतूक करणारे जहाज पश्चिम आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर १७ मार्च २०२५ रोजी रात्री ७:४५ वाजता समुद्री चाचांच्या ताब्यात सापडले आहे. या जहाजावर एकूण १८ क्रू मेंबर असून, त्यातील दहा जणांना समुद्री चाचे साेबत घेऊन गेले आहेत. या दहा जणांमध्ये सात भारतीय तर तीन राेमेयिन नागरिक आहेत.

रत्नागिरीतील जावेद मिरकर, शब्बीर सोलकर यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी बंदर कार्यालयाला पत्र लिहून तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. हायजॅक केलेले जहाज भारतातील मॅरिटेक टँकर मॅनेजमेंट कंपनीद्वारे संचालित आहे. आम्हाला मुंबईत डीजी शिपिंगकडे जाणे शक्य नाही. आमच्या मुलांबाबत लवकरात लवकर माहिती मिळावी, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे आहे.

दुसरा खलाशी न आल्याने सापडला

समीन मिरकर हा १५ मार्च रोजी घरी येण्यासाठी जहाजावरून उतरणार होता. मात्र, त्याच्याऐवजी दुसरा खलाशी न आल्याने जहाजावरून उतरू शकला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी समुद्र चाच्यांनी १० जणांना ओलिस ठेवले त्यामध्ये समीनचा समावेश आहे.

Web Title: Nigerian pirates hijack ship off African coast take ten hostages including two from Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.