परशुराम घाटासाठी नव्याने केंद्राकडे उपाययोजनांचा प्रस्ताव; मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केली महामार्गाच्या कामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:47 IST2025-08-09T17:46:42+5:302025-08-09T17:47:51+5:30
परशुराम घाटातील उपाययाेजनांबाबत सरकार गंभीर

संग्रहित छाया
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिली.
मंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा परशुराम घाटातील धोकादायक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी परशुराम घाटातील उपाययाेजनांबाबत सरकार गंभीर असून, नव्याने उपाययाेजना करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी शिवेंद्रसिंह भाेसले यांनी चिपळूण तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट दिली. सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे परशुराम घाटाजवळ आगमन झाले. महायुतीच्या वतीने आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे जयद्रथ खताते, भाजपचे रामदास राणे, शिंदेसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख मिलिंद कापडी, मयूर खेतले, निहार कोवळे, सुयोग चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम, उदय उतारी, भाजपचे विनोद भुरण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी परशुराम घाटाची प्रत्यक्ष पाहणी न करता ‘घाटाला वळसा’ घालून थेट चिपळूण शहरात आगमन केले. पुढे मंत्री पाग पॉवर हाऊस येथे पोहोचले. येथे झालेल्या चर्चेत माजी आमदार विनय नातू, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महामार्गावरील अडचणींबाबत निवेदन
चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असताना झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एका विद्यार्थ्यावर सळी कोसळल्याने झालेल्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निहार कोवळे यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे केली. महामार्गावरील अडचणींबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर निवेदने सादर केली.