खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये उभ्या कापलेल्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे कोसळून रस्त्यावर येण्याची भीती आहे. त्यामुळे हे मातीचे ढिगारे राेखण्यासाठी ‘गल्वेनाइज्ड स्टील’ जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे घाटात अचानक दरडी कोसळून वाहतूक ठप्प होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.तीन वर्षांपूर्वी एका फार्महाऊसकडे जाण्यासाठी चोळई येथील डोंगरावर रस्ता तयार केल्यानंतर डोंगरातून लालमातीचा ढिगारा दरडीसह महामार्ग व्यापून दरीकडील बाजूच्या लोकवस्तीतील घरांना धोका निर्माण झाला होता. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना महामार्गालगतचे डोंगर उभे कापण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना झाल्या.
या दरडींना राेखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाने रस्ता आणि डोंगराच्या पायथ्याशी काँक्रिटच्या संरक्षक भिंती उभारल्या. मात्र, काँक्रिटच्या संरक्षक भिंतीही निरुपयोगी ठरल्या. त्यामुळे वाहतुकीला असलेला दरडींचा धोका कायम राहिला आहे.कशेडी घाटातील चोळई व धामणदेवी भोगाव या दरडग्रस्त क्षेत्रावर महामार्ग बांधकाम विभागाने उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळू पाहणाऱ्या धोकादायक दरडीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून ‘गल्वेनाइज्ड स्टील’च्या ३०-३५ फूट उंच जाळ्या बसविण्यात येत आहेत. या जाळ्यांमुळे उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडींना काही प्रमाणात प्रतिबंध करण्यात आला आहे.दरडग्रस्त भागात धोकादायक दरडींवर ‘गल्वेनाइज्ड स्टील’च्या जाळीचे सुरक्षा कवच टाकण्यात येत असल्याने वाहनचालक व प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या जाळ्यांमुळे रस्त्यावर येणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यांना अटकाव हाेऊन वाहतूक ठप्प हाेण्याचा धाेका टळणार आहे.
गेली २० वर्ष दरडींचा धाेकाकशेडी घाटामध्ये २००५ पासून दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. या दरडी महामार्गावर येत असल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्प हाेण्याचे प्रसंग घडले आहेत. पावसाळ्यात काेसळणाऱ्या दरडींमुळे या मार्गावरील वाहतूकही धाेकादायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘गल्वेनाइज्ड स्टील’ जाळ्या बसविण्यात येत आहेत.