राज्यात नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:23 IST2025-09-18T17:22:41+5:302025-09-18T17:23:39+5:30

नमो मराठी अभियान राबविणार

Namo Skill Development Center Cluster to be started in the state, announced by Industry Minister Uday Samant | राज्यात नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

राज्यात नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी बुधवारी रत्नागिरीत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर आणि नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री सामंत यांनी सांगितले की, देशात प्रथमच महाराष्ट्रात पाच ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे होत आहेत. त्या कौशल्य विकास केंद्रांचे क्लस्टर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे नाव नमो कौशल्य विकास केंद्र क्लस्टर असे असेल. यामध्ये पाच कौशल्य विकास केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये नमो अभियान विधि कौशल्य केंद्र, नमो ऑटोमोबाइल्स कौशल्य केंद्र, नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र, नमो सॉफ्ट स्कील कौशल्य केंद्र आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र यांचा समावेश असेल.

या केंद्रांच्या पाच इमारती नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे तयार आहेत. या इमारतींचा नामकरण सोहळा आणि उद्घाटन सोहळा लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वी उद्योग खाते हातात घेतल्यानंतर अनेक प्रकल्प बाहेर गेल्याची ओरड करण्यात येत होती. त्यापैकी बीडीपी नावाचा प्रकल्प गेल्याचे सांगण्यात येत हाेते. राज्य सरकारने केंद्र शासनाच्या मदतीने बीडीपी प्रकल्प केला नसला तरी आता हा बीडीपी प्रकल्प उद्योग विभागाने स्वत:च्या ताकदीवर उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत याची घोषणा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क असे नाव देण्यात येणार असून, हा प्रकल्प रायगड येथे होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नमो मराठी अभियान राबविणार

नमो मराठी अभियान हे जागतिक स्तरावर एक वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मंचाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच ७५ मराठी मंच तयार करण्यात येणार आहेत. हे मंच लंडनमधील छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक केंद्राला संलग्न करण्यात येणार आहेत. त्यानंतर लंडनमधून मंचाचे काम चालणार आहे, असेही जाहीर केले.

Web Title: Namo Skill Development Center Cluster to be started in the state, announced by Industry Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.