महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खासदार नारायण राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:50 IST2024-12-24T13:47:44+5:302024-12-24T13:50:32+5:30
रत्नागिरी : महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना ...

महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खासदार नारायण राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
रत्नागिरी : महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिली. ते रत्नागिरीत येथे आढावा बैठकीसाठी आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीची माहिती खासदार राणे यांनी दिली. राजापूर येथील अर्जुना नदीतील गाळ काढणे, मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम, चिपळूण पूरहानी तसेच वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदल कंपनीतील वायूगळतीमुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास अशा विषयांमध्ये काय कारवाई करण्यात आली, याची माहिती विचारताना खासदार राणे यांनी चिपळूण विमानतळाबाबत जागा संपादित केली आहे का, याचाही आढावा घेतला.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे दोन ठेकेदार यापूर्वीच पळून गेले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कामासाठी शासनाकडून तिसरा ठेकेदार नेमला आहे. हा ठेकेदार मध्येच काम सोडून जाऊ नये, याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, आपण हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत. कारण मे महिन्यात काम झाले नाही तर पुढे पावसाळा आला आहे. आता ते काम कसे पूर्ण करणार, असे कारण पुढे करण्यात येईल. त्यासाठीच महामार्गाचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.