Ratnagiri: गुहागर तालुक्यातील बहुतांश शाळांना क्रीडांगणच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:01 IST2024-12-06T18:01:07+5:302024-12-06T18:01:43+5:30

मंदार गोयथळे गुहागर : शालेय अभ्यासक्रमात तसेच क्रीडा स्पर्धांमध्येही गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळा सातत्याने जिल्हास्तरावर अव्वल क्रमांक पटकावत असतात. ...

Most of the schools in Guhagar taluka do not have playgrounds | Ratnagiri: गुहागर तालुक्यातील बहुतांश शाळांना क्रीडांगणच नाही

संग्रहित छाया

मंदार गोयथळे

गुहागर : शालेय अभ्यासक्रमात तसेच क्रीडा स्पर्धांमध्येही गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळा सातत्याने जिल्हास्तरावर अव्वल क्रमांक पटकावत असतात. मात्र तालुक्यातील २०५ प्राथमिक शाळांपैकी १९० प्राथमिक शाळांच्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणच उपलब्ध नाही. हिवाळी क्रीडा स्पर्धांचा मौसम आता सुरू होणार असून, त्यानिमित्ताने ही बाब अधोरेखित झाली आहे.

गुहागर तालुका शिक्षण विभागाच्या २०५ प्राथमिक शाळा व २० केंद्रशाळा आहेत. गेल्यावर्षी शिक्षण विभागाने शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय अहवाल जिल्हा परिषदेला पाठवला होता. त्यानंतर तो पुढे शासनाकडे सुपुर्द करण्यात आला. यामध्ये गुहागरमधील १९० प्राथमिक शाळांना क्रीडांगण नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

क्रीडा शिक्षण प्राथमिक शाळांना अनिवार्य असल्याकारणाने शाळांचे शिक्षक व गावातील प्रमुख नागरिक मुलांच्या खेळाची सोय अन्य मोकळ्या जागी किंवा शेतामध्ये करतात. अशा ठिकाणी शाळांचे क्रीडाशिक्षक मैदान तयार करून मुलांचा सराव घेतात.

ही मैदाने तात्पुरती तयार केली असल्याकारणाने तिचा वापरही काही ठराविक दिवसांपुरता मर्यादित असतो. त्यामुळे शाळेमध्ये शासनाकडून उपलब्ध केलेले क्रीडा साहित्य मुलांना वापरता येत नाही. क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी योग्य सराव होत नसला तरीही गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळांची क्रीडा स्पर्धेतील कामगिरी सतत उंचावलेली दिसून येत आहे.

प्राथमिक शाळांमधून सर्वांगीण शिक्षण मिळावे, यासाठी योग्य साधनसामग्रीमध्येही या शाळा कमी पडत आहेत. त्यामुळे पालकांच्या डोक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गावातील प्राथमिक शाळेच्या पटसंख्येवर विपरित परिणाम होत असून, त्यामुळे शिक्षकांचीही कमतरता करण्यात येत आहे.

आजही जिल्हा परिषदच्या शाळांकडे ग्रामस्थ सकारात्मक दृष्टीने पाहत असून, ही आपली शाळा असे समजून तिच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक उठाव या नावाखाली पालक आपल्या खिशाला चाट देत आहेत. मात्र, यामुळे शाळेच्या सर्वांगीण गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांमध्ये भौतिक आणि शैक्षणिक सुधारणेकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Most of the schools in Guhagar taluka do not have playgrounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.