आमदार भास्कर जाधव यांनी चालवली एसटी बस; चिपळूण एसटी आगारात नवीन ५ बसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:56 IST2025-07-01T17:55:43+5:302025-07-01T17:56:03+5:30
एसटी बस चालवून शहरातून फेरफटका मारला

आमदार भास्कर जाधव यांनी चालवली एसटी बस; चिपळूण एसटी आगारात नवीन ५ बसेस
चिपळूण : प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाकडून येथील आगाराला ५ नवीन एसटी बसेस देण्यात आल्या. आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या नवीन गाड्यांचे लोकार्पण श्रीफळ वाढवून करण्यात आले. आमदार जाधव यांनी शहरात बस चालवून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे या नवीन एसटी बसकडे लक्ष वेधून घेतले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १० नवीन बसेस पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे चिपळूण आगाराला ५ बसेस मिळाल्या आहेत. अजून ५ बसेस लवकरच दाखल होणार आहेत. बीएस ६ मॉडेलच्या या एसटी बसेस आकर्षक व तितक्याच दमदार आहेत. या पाचही बसेस चिपळूण आगारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रांगोळी काढत व पेढे वाटून आनंद साजरा केला. यानंतर आमदार जाधव व निकम यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जाधव यांनी एसटी बस चालवून शहरातून फेरफटका मारला. यावेळी आमदार निकम हेही प्रवासी म्हणून बसमध्ये उपस्थित होते.
यावेळी आमदार जाधव म्हणाले की, जिल्ह्यात ५५ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. इतर तालुक्यात याआधीच बसेस मिळाल्या. त्यानंतर आता चिपळूण आगारात ५ बसेस मिळाल्या आहेत. उर्वरित बसेस लवकरच दाखल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार निकम म्हणाले की, नवीन बसमधून चांगला प्रवास झाला. बसचे स्टेअरिंग आमदार जाधव यांच्या हाती असल्याने आम्ही बिनधास्त होतो. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, जयंद्रथ खताते, दादा साळवी, शौकत मुकादम, मिलिंद कापडी, उदय ओतारी, दशरथ दाभोळकर, मयुर खेतले, रमेश राणे, नीलेश कदम, बिलाल पालकर, आदिती देशपांडे, पूजा निकम, आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण उपस्थित होते.