मंत्री उदय सामंत यांनी केली चौफेर फटकेबाजी, मळ्यामध्ये मुलांसोबत लुटला क्रिकेटचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:49 IST2024-12-31T13:48:10+5:302024-12-31T13:49:49+5:30
मुलांशी संवाद साधून खेळाबाबत चर्चा केली

मंत्री उदय सामंत यांनी केली चौफेर फटकेबाजी, मळ्यामध्ये मुलांसोबत लुटला क्रिकेटचा आनंद
रत्नागिरी : मळ्यांमध्ये क्रिकेट खेळताना मुलांना पाहताच राज्याचे उद्याेग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही क्रिकेट खेळण्याचा माेह आवरला नाही. आपली गाडी थांबवून ते थेट मैदानात उतरले आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राजकारणात चाैफेर फटकेबाजी करणाऱ्या मंत्री सामंत यांनी काेळंबे (ता. रत्नागिरी) येथील मैदानात चाैकार, षटकार लगावले.
मंत्री सामंत रविवारी रत्नागिरी दाैऱ्यावर हाेते. तालुक्यातील काेळंबे भागात दाैरा करत असतानाच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मळ्यामध्ये गावातील मुले क्रिकेट खेळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि सारे प्राेटाेकाॅल बाजूला ठेवून, आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. गावातील खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना त्यांनी फलंदाजी करताना जाेरदार फटकेबाजी केली. त्यांच्या फलंदाजीमुळे ग्रामस्थांनी विशेष आनंद व्यक्त केला. ग्रामस्थांनी त्यांच्यासाेबत फाेटाे काढून हा क्षण कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवला.
मुलांशी संवाद
मंत्री सामंत यांनी मुलांशी संवाद साधून खेळाबाबत चर्चा केली. त्यांनी मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघ भावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले. खेळामुळे केवळ शरीरस्वास्थ्यच नाही, तर मानसिक आरोग्यही चांगले राहते, असे सामंत यांनी सांगितले.