रत्नागिरीसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू हरचिरीजवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:38 IST2026-03-13T13:37:38+5:302026-03-13T13:38:33+5:30
भूकंपाचा धक्का लांजा तालुक्यालाही जाणवला

रत्नागिरीसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू हरचिरीजवळ
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह लगतच्या परिसरात गुरुवारी (१२ मार्च) रात्री ८ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीजवळील हरचिरी येथे जमिनीच्या खाली साधारण १० किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती ‘राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने’ (एनसीएस) दिली आहे. याला जिल्हा प्रशासनाकडून दुजोरा दिला आहे.
भूकंपाची तीव्रता कमी असल्याने जिल्ह्यात कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या या भूकंपामुळे शहरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचा धक्का लांजा तालुक्यालाही जाणवला.