मंडणगडमध्ये हजार एकरमध्ये एमआयडीसी : राज्यमंत्री योगेश कदम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:32 IST2025-04-15T11:32:13+5:302025-04-15T11:32:38+5:30
महापुरुषांना जाती, धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नये

मंडणगडमध्ये हजार एकरमध्ये एमआयडीसी : राज्यमंत्री योगेश कदम
मंडणगड : उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंडणगड येथे लवकरच एक हजार एकरमध्ये एमआयडीसी उभी केली जाईल. पहिला टप्प्यात सहाशे एकर आणि दुसऱ्या टप्प्यात चारशे एकर भूसंपादन केले जाईल. या एमआयडीसीमुळे या तालुक्यात रोजगार निर्मिती होईल आणि मुंबईकडे होणारे स्थलांतर थांबेल, असे उद्गार गृह तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले. हजारो लोकांना उपयुक्त ठरेल, असे काम करणे हीच आपली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे (ता. मंडणगड) येथील जयंती समारंभात ते बोलत होते. पालकमंत्री आणि मी दोघेही नशीबवान आहोत. ही बाब राज्यात फिरताना अभिमानाने सांगत असतो. कारण, बाबासाहेबांचे मूळ गाव हे माझ्या मतदार संघात आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे, असे ते म्हणाले.
समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी संविधानाच्या उद्देशिका देत राज्यमंत्री कदम यांचे स्वागत केले. यशोदा महिला बचत गट, अनिशा रमेश जाधव, प्रेरणा गायकवाड, राज वेताळ, बाळकृष्ण मेडेकर, श्रद्धा मर्चंडे या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सचिव नरेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सकपाळ, सुरेश सकपाळ, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, प्रताप घोसाळकर, प्रातांधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी विशाल जाधव, गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे, सरपंच दीपिका जाकल यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
महापुरुषांना जाती, धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे अनेक पैलू आहेत, ज्यावर आपण विचार करत नाही. त्यामुळे मनाला वेदना होतात. महापुरुषांना आपण जाती, धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो, ही दुर्दैवी गोष्ट आहे. संविधानातील गोष्टी वाचून पाहिल्या तर, आपण जाती, धर्माच्या बंधनातून बाहेर पडू. जात, धर्म यापलिकडे माणुसकी आहे, हाच संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. त्यावर पुढे जाऊया, असे आवाहन त्यांनी केले.