व्यापाऱ्यांचा कचरा वेरवली कोंड, मुचकुंदी नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 16:35 IST2017-10-19T16:26:22+5:302017-10-19T16:35:38+5:30
लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत बाहेरुन येणारे व्यापारी व स्थानिक दुकानदार हे आपल्याकडे तयार होणारा कचरा पेठदेव ते वेरवली कोंड व मुचकुंदी नदी पात्रात टाकत असल्याने मुचकुंदी नदीचे पाणी प्रदुषित होत आहे.

व्यापाऱ्यांचा कचरा वेरवली कोंड, मुचकुंदी नदीपात्रात
लांजा , दि. १९ : तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत बाहेरुन येणारे व्यापारी व स्थानिक दुकानदार हे आपल्याकडे तयार होणारा कचरा पेठदेव ते वेरवली कोंड व मुचकुंदी नदी पात्रात टाकत असल्याने मुचकुंदी नदीचे पाणी प्रदुषित होत आहे.
वेरवली कोंड येथील ग्रामस्थांनी भांबेड ग्रामपंचायतीला याबाबत निवेदनाव्दारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील पूर्व भागातील भांबेड ही तालुक्यातील दोन क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो. त्यासाठी कोल्हापूर व सातारा येथून अनेक व्यापारी येथे येतात.
ही बाजारपेठ मध्यवर्ती ठिकाणी वसलेली असल्याने भांबेड परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे दर आठवडा बाजाराला मोठी गर्दी पहावयास मिळते. यातून येथे प्रचंड कचरा निर्माण होतो. या कचयाची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असताना, बाहेरुन येणारे व्यापारी व येथील स्थानिक दुकानदार पेठदेव ते वेरवली कोंडदरम्यान कचरा टाकतात.
येथून वाहणाऱ्या मुचकुंदी नदी पात्रातही कचरा टाकला जातो. त्यामुळे नदीचे पाणीप्रदूषण होत असून शिवाय पेठदेव ते वेरवली कोंड परिसरात कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, वेरवली कोंड व भांबेड बाजारपेठला जोडणाऱ्या पादचारी रस्त्याच्या दुतर्फा हा कचरा टाकला जातो.
वेरवली कोंड येथून भांबेड बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना कचऱ्याच्या घाणीमुळे नाकावर रुमाल घेऊन मार्गक्रमण करावे लागते. प्रचंड कचरा, त्यात किळसवाण्या दुर्गंधामुळे वेरवली कोंड येथील लोक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायतीला निवेदन देऊन योग्य कारवाईची मागणी केली जात आहे.