पर्यटनवाढीसाठी मारळनगरीत मार्लेश्वर महोत्सव, लोककलांचे सादरीकरण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:26 IST2023-01-10T14:25:46+5:302023-01-10T14:26:06+5:30
महोत्सवात संगमेश्वरी बोली, हार्मोनियम सोलो वादन, जाखडी नृत्य, शाहिरी खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार

पर्यटनवाढीसाठी मारळनगरीत मार्लेश्वर महोत्सव, लोककलांचे सादरीकरण होणार
देवरुख : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. त्याचा अधिक विकास व्हावा व पर्यटक, भाविक यांचे येणे- जाणे वाढावे, यासाठी आपण पुढाकार घेत आहे. याचाच एक भाग म्हणून १३ व १४ जानेवारीला मारळनगरीत आपण दोन दिवसांचा मार्लेश्वर महोत्सव भरवणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘लोककलांचा’ हा महोत्सव असणार आहे. या महोत्सवाची संकल्पना प्रद्युम्न माने यांची आहे.
रवींद्र माने, नेहा माने यांच्या नियोजनात हा महोत्सव रंगणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संगमेश्वर तालुका व मारळ पंचक्रोशीतील शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच मानकरी आणि देवनगरी देवरुख क्रांती व्यापारी संघटना यासाठी सहकार्य करणार आहेत.
महाेत्सवाचे उद्घाटन १३ रोजी सायंकाळी सात वाजता खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माजी रोहन बने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने स्थानिकांचे खाद्यपदार्थांचे स्टाॅल लागणार आहेत.
मार्लेश्वर परिसरातील सोयी- सुविधा, तसेच धारेश्वर धबधब्याकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग, अशा अनेक सुधारणा करण्यासाठी आपण आराखडा तयार केला आहे. शासनाच्या माध्यमातून यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती रवींद्र माने यांनी दिली.
तसेच संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळे असलेल्या ठिकाणांची माहिती एलसीडी स्क्रीनद्वारे भाविकांना दाखवण्यात येणार आहे. भाविकांना एकप्रकारे चांगलीच पर्वणी मिळणार आहे.
लोककलांचा समावेश
महोत्सवात संगमेश्वरी बोली, हार्मोनियम सोलो वादन, जाखडी नृत्य, शाहिरी खडे भजन, वारकरी भजन अशा लोककलांचे सादरीकरण होणार आहे. सर्व भाविकांना तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या माहिती व्हावी, हा मुख्य उद्देश या मार्लेश्वर महोत्सवाचा आहे. मारळनगरीतील पवई येथे प्रथमच अशा प्रकारचा दोन दिवसीय मार्लेश्वर महोत्सव सायंकाळी सात ते अकरा या वेळेत होत असल्याचे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी सांगितले.