धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून रत्नागिरीत बंदुकांची निर्मिती : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:12 IST2025-01-28T19:11:23+5:302025-01-28T19:12:03+5:30

रत्नागिरी : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम ...

Manufacturing of firearms in Ratnagiri from Dhirubhai Ambani Defense Cluster says Uday Samant | धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून रत्नागिरीत बंदुकांची निर्मिती : उदय सामंत

धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून रत्नागिरीत बंदुकांची निर्मिती : उदय सामंत

रत्नागिरी : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर प्रकल्पाने केले आहे. दुसरा प्रकल्प गुहागरमध्ये मूर्त स्वरूप घेत आहे. कशेळी हे संपूर्ण गाव सौरऊर्जेवर करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

जगात सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारत देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे. सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा, विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात यशस्वी झालो. उर्वरित तालुक्यांतही शिवसृष्टी उभारण्याचे काम दोन वर्षांत केले जाईल.

थिबा राजाने प्रतिष्ठापना केलेल्या बुद्ध मंदिराच्या ठिकाणी साडेआठ कोटी खर्चून बुद्धविहाराच्या वास्तूचे काम सुरू करण्यात आले आहे. देशातील पहिल्या सागरी विद्यापीठाची सुरुवात वर्षभरात करायची आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडला होण्यासाठी सव्वा कोटी रुपये मराठी विभागाकडून दिले जातील. भविष्यातही देशाची, झेंड्याची शान अशीच कायम ठेवावी, त्यासाठी देशभक्तिपर कार्यक्रम प्रशासनाकडून राबविले जावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री सामंत यांनी परेड निरीक्षण केले. यानंतर पोलिस पथक, महिला पोलिस पथक, गृहरक्षक दल, पोलिस बँड पथक, गृहरक्षक महिला पथक, एनसीसी स्काऊट-गाइड, एनसीसी नेवल, नवोदय विद्यालय स्टुडन्ट पोलिस कॅडेट, विराट श्वानपथक, जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दल, उमेद टुरिस्ट व्हॅन, प्राथमिक शिक्षक विभाग आदींनी संचलन करून मानवंदना दिली. यामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, ए.डी. नाईक गर्ल्स हायस्कूल, गोदुताई जांभेकर विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, शिर्के हायस्कूल, कॉन्वेन्ट स्कूल आदींचा सहभाग होता.

Web Title: Manufacturing of firearms in Ratnagiri from Dhirubhai Ambani Defense Cluster says Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.