पुनर्मोहरामुळे आंबा बागायतदार धास्तावले, नैसर्गिक संकटामुळे पीक धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:27 IST2025-01-14T17:27:12+5:302025-01-14T17:27:34+5:30

रत्नागिरी : हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा पिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम ...

Mango growers scared due to re sealing, crop in danger due to natural calamity | पुनर्मोहरामुळे आंबा बागायतदार धास्तावले, नैसर्गिक संकटामुळे पीक धोक्यात 

पुनर्मोहरामुळे आंबा बागायतदार धास्तावले, नैसर्गिक संकटामुळे पीक धोक्यात 

रत्नागिरी : हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा पिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम झाल्याने तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय पुनर्मोहर सुरू झाल्याने बागायतदार धास्तावले आहेत. खत व्यवस्थापनापासून आंबा पीक बाजारात येईपर्यंत लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यातच नैसर्गिक संकटामुळे पीक धोक्यात येऊन बागायतदारांना याचा फटका बसत आहे.

यावर्षी पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. जमिनीतील ओलाव्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली, डिसेंबरमध्ये थंडी वाढताच काही झाडांना मोहोर आला. त्यामुळे एकाच झाडाला पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती होती. काही ठिकाणी फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. परंतु अपेक्षित फळधारणा झाली नाही. निव्वळ मोहर राहिला, फळधारणा न झाल्यामुळे मोहर वाळला व काड्या शिल्लक राहिल्या आहेत. फळधारणा झालेल्या ठिकाणीच पुनर्मोहर सुरू झाल्याने फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

डिसेंबरमध्ये ‘फेंगल’ वादळामुळे काही ठिकाणी पाऊस झाला, काही दिवस हवेत मळभ होते. कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्ससाठी हे वातावरण पोषक असल्याने बागायतदारांनी डोकेदुखी वाढली. मोहर व फळांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. फवारणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप आंबा पिकाचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा पिकाचे चित्र धूसर असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप आंबा हंगाम कसा असेल, याबाबत बागायतदार खात्री देत येत नाही.

हवामानातील बदलामुळे पिकाची उत्पादकता खालावली आहे. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असूनही आंबा पीक, कीडरोग नियंत्रणाबाबत योग्य संशोधन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

यावर्षी मोहर व पालवी अशी संमिश्र स्थिती आहे. केवळ फुलोरा आला, फळधारणा झालीच नाही. जानेवारी निम्मा संपला तरी आंबा हंगामाचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. कीडरोग नियंत्रणासाठी मात्र वारेमाप खर्च करावा लागत आहे.- राजन कदम, बागायतदार.

Web Title: Mango growers scared due to re sealing, crop in danger due to natural calamity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.