Ratnagiri Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:18 IST2025-02-12T18:17:46+5:302025-02-12T18:18:17+5:30
रत्नागिरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर कोल्हापूर येथे लैंगिक अत्याचार ...

Ratnagiri Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास
रत्नागिरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर कोल्हापूर येथे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार २०२३मध्ये घडला हाेता. याप्रकरणी आरोपी रुपेश महादेव गुरव (वय ३१, रा. गोंडेसकल-गुरववाडी, लांजा) याला न्यायालयाने मंगळवारी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
पीडितेची तिच्या आईच्या फेसबुक खात्यावरून रुपेश गुरव याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून रुपेशने पीडितेला ‘तुला विशाळगड फिरायला घेऊन जाताे,’ असे सांगितले. त्यानंतर १ मे २०२३ रोजी ताे पीडितेला आपल्या दुचाकीवरून कोल्हापूर येथील एअरटेल टॉवर माने कॉलनी करवीर येथील एका खाेलीवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.
याप्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. मेघना नलावडे यांनी १० साक्षीदार तपासले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला सश्रम कारावास ठाेठावला आहे. या खटल्यात मुख्य कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार वर्षा चव्हाण यांनी व पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांनी काम पाहिले.
अशी ठाेठावली शिक्षा
भारतीय दंड विधान कायदा कलम ३६३ मध्ये ३ वर्ष कारावास आणि २ हजार दंड, ३७६ (२) (जे) मध्ये ७ वर्ष कारावास व २ हजार दंड, ३७६ (३) मध्ये २० वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंड तसेच पोक्सो ४ मध्ये २० वर्ष कारावास व ५ हजार दंड आणि पोक्सो ८ मध्ये ३ वर्ष कारावास आणि २ हजार रुपये दंड अशी २० वर्ष सश्रम कारावास ठाेठावला आहे. तसेच १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १२ हजार दंड पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत.