मनसैनिकांचा चिपळूणमध्ये परप्रांतीय बँकांना मराठी दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:39 IST2025-04-05T19:38:55+5:302025-04-05T19:39:25+5:30
चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी चिपळूणमध्ये परप्रांतीय भाषीय बँकांना दणका दिला. मराठी भाषेचा वापर करा, माहितीफलक मराठीत ...

मनसैनिकांचा चिपळूणमध्ये परप्रांतीय बँकांना मराठी दणका
चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी चिपळूणमध्ये परप्रांतीय भाषीय बँकांना दणका दिला. मराठी भाषेचा वापर करा, माहितीफलक मराठीत लिहा; अन्यथा मराठी भाषा शिकवावी लागेल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला.
कार्यकर्त्यांनी बँकेतील इंग्रजी भाषेतील पोस्टर काढून टाकत आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर कार्यकर्ते इथे येऊन मराठीचा धडा शिकवतील, असा इशाराही दिला.
गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा जागर केला. महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे, बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, असा आग्रह धरला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. मनसेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कार्यकर्त्यांनी बँकांना जोरदार दणका दिला.
शहरातील तामिळनाडू बँक, इंडस इंड बँक, दिशा संगणक प्रशिक्षण केंद्र अशा अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे याच्या नेतृत्वाखाली तालुका सचिव संदेश साळवी, शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी, उपशहराध्यक्ष सनी शेलार, विभाग अध्यक्ष नितीन गोवळकर, अतीश भांड यांनी बँक व्यवस्थापकांची भेट घेतली.
तामिळनाडू बँकेतील सर्व कर्मचारी परप्रांतीय आहेत. त्यांना मराठी भाषा कळत नाही. या ठिकाणी लावण्यात आलेली पोस्टर इंग्रजी भाषेत होती. कार्यकर्त्यांनी ती काढून टाकली.