गणपतीपुळेत महाप्रसादाची वेळ वाढली; हॉटेल व्यावसायिकांनी दिला चुलीवरील जेवणाचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:29 IST2026-03-25T15:28:57+5:302026-03-25T15:29:58+5:30
अमेरिका आणि इराणमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला

संग्रहित छाया
गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल्स व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका भाविकांना बसू नये, यासाठी महाप्रसादाची वेळ वाढविण्याचा निर्णय श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानने घेतला आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही चुलीवरील जेवणाची व्यवस्था केली असून, पर्यटक व भाविकांनी बिनदिक्कत गणपतीपुळेमध्ये यावे, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक तसेच गणपतीपुळे देवस्थानने केले आहे.
अमेरिका आणि इराणमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. त्याचा खूप मोठा परिणाम व्यावसायिक गॅस सिलिंडरवर झाला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स, खानावळी, वडापाव चहाच्या टपऱ्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व भाविक गणपतीपुळे येथे येण्याआधी हॉटेल्स चालू आहे का, आम्हाला जेवण मिळेल का, अशी चौकशी करत आहेत. येथील पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलमध्ये चुलीवरच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था केली आहे.
काही हॉटेल्स बंद असल्याने येथे येणाऱ्या भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, येथे आलेला भक्त उपाशी राहू नये, यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळेमार्फत महाप्रसादाची वेळ वाढविण्यात आली आहे. दुपारी १२:३० ते २:०० या आधीच्या वेळेत बदल करून आता १२:३० ते ३:०० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७:०० ते ८:१५ऐवजी ७ ते ८:४५ अशी वेळ करण्यात आली आहे.