Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा
By मनोज मुळ्ये | Updated: March 30, 2024 17:30 IST2024-03-30T17:30:11+5:302024-03-30T17:30:54+5:30
पक्षातील फुटीचा ठाकरे गटाला मोठा त्रास, तीन पक्षांमुळे महायुतीची ताकद वाढली

Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : वीस वर्षांची आमदारकी आणि त्यात गेली पाच वर्षे मंत्रिपद असलेल्या उदय सामंत यांच्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी पर्यायाने महायुतीसाठी घरचे मैदान आहे. विद्यमान खासदारकी असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी शिवसेनेतील फूट हा सर्वांत मोठा त्रासदायक भाग ठरणार आहे. अर्थात उमेदवारी कोणाला मिळणार, यावरही काही गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत संभ्रम कायम आहे.
लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजण्याआधीपासूनच ठाकरे शिवसेना मैदानात दाखल झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक दौरा झाला आहे. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा पहिला दौरा झाला आहे. उमेदवार निश्चित असल्याने महायुतीच्या तुलनेत ठाकरे शिवसेनेने प्रचारावर लवकर भर दिला आहे. महायुतीमध्ये अजूनही जागा कोणाला यावरच निर्णय झालेला नाही. अर्थात तरीही शिवसेनेकडून किरण सामंत यांनी आपल्या पद्धतीने प्रचार सुरूच ठेवला आहे.
२०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक यात खूप मोठा फरक आहे. २०१९ साली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य होते. मध्यंतरीच्या राजकीय स्फोटामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली.
गत लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. १ लाख ७८ हजार मताधिक्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा वाटा ५९,५५९ इतका होता; पण त्यासाठी उदय सामंत आणि किरण सामंत ही दोन नावे कारणीभूत होती. आता ते राऊत यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे विनायक राऊत यांच्यासाठी या मतदारसंघात आघाडी घेणे खूपच आव्हानात्मक आहे. त्यातच बाळ माने यांनी या मतदार संघात अनेक वर्षे भाजपची मते टिकवून ठेवली आहेत, हेही विसरुन चालणार नाही.
बदललेले चिन्ह रुजवणे गरजेचे
शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ठाकरे यांना आपल्या पक्षाचे नाव बदलून घ्यावे लागले आहे. त्याहीपेक्षा मशाल या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत, हे अधिक गोंधळात टाकणारे आहे. ग्रामीण भागातील लोकांना धनुष्यबाण परिचित आहे. मशाल त्यांच्यासाठी नवी आहे. हे चिन्ह लोकांमध्ये रुजवणे हेही ठाकरे शिवसेनेसाठी आव्हान आहे.
फुटीमुळे विभागणी
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे शिवसेना हा मोठा पक्ष असला, तरी सद्य:स्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते विभागले गेले आहेत. त्यामुळे मतांचीही मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे.
ठाकरे सेनेला सहानुभूती मिळेल?
पक्षातील फुटीबाबत लोकांची सहानुभूती मिळेल, अशी ठाकरे शिवसेनेला अपेक्षा आहे. वर्षानुवर्षे कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सामान्य माणूस ठाकरे शिवसेनेच्या बाजूने राहील, अशी त्यांची अपेक्षा आहे. सामान्य लोकांना पक्षफुटीबाबत काय वाटते, हे कळण्यासाठी आतापर्यंत एकही मोठी निवडणूक झालेली नाही. ते याच निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ; पण...
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाली. शिवसेनेत फूट पडली असली तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ विनायक राऊत यांना मिळणार आहे.
- पण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन पक्षांची ताकद खूपच कमी आहे. शिवसेनेची बाजूला गेलेली मते भरून काढण्यासाठी ही ताकद पुरेशी नाही. त्यातही राष्ट्रवादीचे मतदार आपल्यासोबत ठेवण्यात उदय सामंत यांना यश आले असल्याचे आधीच्या निवडणुकांमधील त्यांच्या मतांवरून दिसते.
- त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ मिळूनही राऊत यांना कितीसा फायदा होईल, याबाबत शंकाच आहे.