Ratnagiri: लोटे एमआयडीसी स्फाेटाने हादरली; कामगार ठार, आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:13 IST2025-05-19T12:12:14+5:302025-05-19T12:13:03+5:30

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या

Lote Industrial Estate Sphat in Khed Taluka Workers killed | Ratnagiri: लोटे एमआयडीसी स्फाेटाने हादरली; कामगार ठार, आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक

Ratnagiri: लोटे एमआयडीसी स्फाेटाने हादरली; कामगार ठार, आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्याेगिक वसाहत रविवारी स्फाेटांनी हादरली. लासा सुपरजिनेरिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झाली नाही. तर, काही तासांच्या अंतराने ॲक्विला ऑरगॅनिक कंपनीत रिॲक्टरचा स्फाेट झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, अन्य एका कामगाराला ऐराेली येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दिलीप दत्तात्रय निचिते (४७, सध्या रा. खेड, मूळ रा. वालशेत, ता. शहापूर, ठाणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर अनंत शांताराम खरपडे (४८, सध्या रा. खेड, मूळ रा. आबिटघर, ता. वाडा, पालघर) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला लासा सुपर जिनेरिक कंपनीत अचानक भीषण आग लागली. आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असले तरी, संपूर्ण कंपनी अवघ्या दोन तासांत जळून खाक झाली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या.

ॲक्विला ऑरगॅनिक कंपनीमध्ये दुपारी २:४५ वाजण्याच्या दरम्यान रिॲक्टरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार गंभीररीत्या होरपळले आहेत. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, यामधील दिलीप निचिते यांना ऐराेली येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या अनंत खरपडे यांना ऐराेली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल झाले हाेते. दोन्ही दुर्घटनांचा सखोल तपास सुरू आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या सलग घडलेल्या दोन दुर्घटनांमुळे लोटे औद्याेगिक वसाहतीतील सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. या रासायनिक कारखान्यांमधील अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे कामगारांचे आणि स्थानिकांचे जीव धोक्यात येत आहेत.

ज्या दोन कंपन्यांमध्ये दुर्घटना झाली त्या ठिकाणी शासनाने घालून दिलेले कोणतेही नियम पाळले जात नव्हते. रुग्णवाहिका आणि फायर सेफ्टीचे नियमही त्या ठिकाणी पाळले गेले नाहीत. जखमी कामगारांना दुचाकीवरून न्यावे लागले हे दुर्दैवी आहे. या दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे. - चंद्रकांत चाळके, सरपंच, लाेटे.

Web Title: Lote Industrial Estate Sphat in Khed Taluka Workers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.