पाचल : अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती न करता आल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एकही पैसा न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील जीवनदायी प्रकल्प म्हणून अर्जुना मध्यम प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. मात्र, काही वर्षापासून या प्रकल्पाचे पाइपलाइनद्वारे कालव्याचे काम सुरू आहे. पूर्वी या कालव्याचे काम ओपन कालवा पद्धतीने करण्यात येणार होते. मात्र, यामध्ये बदल करून आता कालवा हा बंदिस्त पाइपद्वारे काढण्यात येत आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन खोदकाम सुरू आहे. काही गावांमधून हे काम सुरू आहे. कोरोनामुळे हे काम गेली दोन वर्षे संथगतीने सुरू आहे. पाइपलाइनसाठी जे खोदकाम करण्यात आले ते अद्याप तसेच अर्धवट आहे. मातीही शेजारील शेतामध्ये तशीच टाकण्यात आलेली आहे.
शेतजमिनीतील हे खोदकाम अद्याप बुजविण्यात आलेले नाही व खोदकामाची मातीही उचलण्यात आलेली नाही. परिणामी येथे शेतकरी शेती करू शकले नाहीत. ज्या ठिकाणी खोदकाम मातीने भरलेले नाही. अनेक-मोठे दगड-धोंडे जैसे थे आहेत. खोदलेले चर व्यवस्थित भरले नसल्याने त्यातील माती शेतामध्ये जाऊन भरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना यंदाही शेती करता आलेली नाही. बऱ्याच ठिकाणी आंबा-काजूचे तसेच कुंपणाचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा-काजू बागायतीचे मूल्यांकनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी मोबदल्यापासून आजही वंचित आहेत. या परिसरात शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, ही शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीकडे वरिष्ठ आधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून कमालीचा संताप तथा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.