नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

By Admin | Updated: July 22, 2016 21:53 IST2016-07-22T21:53:06+5:302016-07-22T21:53:06+5:30

संततधार : अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती

The level of danger reached by rivers | नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी
महिनाभरापासून जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांची सध्याची पाणीपातळी ही पुराचा धोका दर्शविणाऱ्या पातळीशी स्पर्धा करू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला संततधार पाऊस आणखी काही दिवस असाच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसात या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यास परिसरातील अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दांडी मारून मान्सूनने सर्वांचीच झोप उडवली होती. त्यानंतर २० जूनपासून मान्सूनचे दणक्यात आगमन झाले. त्यामुळे बळीराजाही सुखावला. मात्र, २० जूनपासून सुरू झालेला पाऊस आजतागायत संततधार बरसत आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी सरींवर बरसणाऱ्या पावसाने पुन्हा दिन-रात जागर सुरू केला आहे. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाने उघडीप दिली. परंतु, सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. हीच स्थिती आणखी आठवडाभर कायम राहिली तर नद्यांना पूर येण्याची भीती आहे.
राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली व सुख या नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्यास काही फूटाचे अंतर राहिले आहे. अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गेल्याच आठवड्यात राजापूर शहरातील कोदवली नदीला पूर आला व राजापूर शहरात तीन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती. अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास राजापूर शहराला याचा धोका आहे. तसेच अर्जुना नदीच्या दुतर्फा वसलेल्या १३५ गावांमधील भातशेतीलाही याचा मोठा धोका आहे. कोदवली नदीची पूर इशारा पातळी ४.९० मीटर असून, २२ जुलै रोजी या नदीमध्ये ४.३० मीटर पाणीपातळी होती. त्यामुळे इशारा पातळीच्या जवळ ही पातळी गेली आहे. अर्जुना नदीच्या दुतर्फा असलेल्या १३५ गावांमधील भातशेती ही सखल भागात असून, या शेतीला पुराचा धोका आहे. तीन ते चार गावांमधील वस्तीला संभाव्य पुराचा धोका पोहोचू शकतो. सुख नदीच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तेथे पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यास १० ते १२ गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीतील पाण्याची इशारा पातळी १६.५० मीटरची असून, सध्याची पाणीपातळी या इशारा पातळीशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या या नदीत १५.२४ मीटर इतकी पाणी पातळी असून, पावसाचा जोर कायम राहिला तर इशारा पातळी ओलांडून परिसरातील गावात पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडमधील जगबुडी नदीचे पाणीही इशारा पातळीच्या जवळ पोहोचले आहे. या नदीची पूर इशारा पातळी ६ मीटर असून, सध्या ५ मीटर पाणीपातळी आहे. या नदीच्या दुतर्फा अनेक गावे वसली असून, शेतीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पावसाचा जोर आठवडाभर कायम राहिला तर या नदीच्या परिसरातील गावांवर पुराची टांगती तलवार राहण्याची भीती आहे. अन्य प्रमुख नद्यांपैकी वाशिष्ठी, सोनवी, मुचकंदी, बावनदी या नद्यांमधील पाणीपातळी आटोक्यात आहे. तेथे पूरसदृश स्थितीचा धोका नाही.



आपत्कालीन यंत्रणा असक्षम
जिल्ह्यात अतिवृष्टी होत असताना आपत्कालीन यंत्रणा मात्र तेवढ्या प्रमाणात सक्षम नसल्याचे चित्र आहे. नद्यांची सध्याची पाणीपातळी पाहता पुराची स्थिती निर्माण झाली तर जिल्हा प्रशासनाकडे आपत्कालीन स्थिती हाताळण्याची काय व्यवस्था आहे, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे प्रसार माध्यमांनी आपत्कालीन यंत्रणेकडे आवश्यक यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात नसल्याबाबत प्रश्न गेल्या महिन्यात उपस्थित केला होता. या व्यवस्थेसाठी तरतूद केली आहे, एवढेच त्यांचे यावर उत्तर होते.

Web Title: The level of danger reached by rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.