Ratnagiri: कशेडी बोगद्यात गळती; पण कोणताही धोका नाही, मंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:17 IST2025-08-08T12:15:44+5:302025-08-08T12:17:03+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश

Ratnagiri: कशेडी बोगद्यात गळती; पण कोणताही धोका नाही, मंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांचे स्पष्टीकरण
खेड : कशेडी बाेगद्यात गळती आहे. मात्र, बाेगद्यात काेणताही धाेका नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांनी गुरुवारी कशेडी बाेगद्याच्या पाहणीदरम्यान दिली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंत्री शिवेंद्रसिंह भाेसले यांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची पाहणी केली. कशेडी बोगद्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना मंत्री भोसले म्हणाले की, सध्या बोगद्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे कोणताही धोका नाही. तांत्रिक बाबींची पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सद्य:स्थितीत मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी तसेच प्रमुख जिल्हा मार्ग आणि ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वीच खड्डे भरण्याचे आश्वासन मंत्री भाेसले यांनी यावेळी दिले, तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री भाेसले यांनी दिली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भूषण काणे, माजी आमदार संजय कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
- गणेशोत्सवाच्या आगमनाआधी खड्डे बुजवण्याची मोहीम.
- राज्यातील ग्रामीण भागांतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त होतील.
- प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देश.
- वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार.