लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीची केंद्रीय मंडळाकडून महिनाभरात पाहणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:12 IST2026-02-20T16:11:20+5:302026-02-20T16:12:36+5:30
सिद्धेश कदम : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र

संग्रहित छाया
दापोली : लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडे केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या उपलब्ध आहेत. मात्र तरीही कंपनीची स्वतंत्र पाहणी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्राद्वारे केली असून, महिनाभरात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक कंपनीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दापोली येथे दिली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
प्रदूषणाच्या मुद्यावरून गेले काही महिने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी वादग्रस्त झाली आहे. मात्र कंपनीकडे केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या असल्याने सध्या कंपनीच्या कामकाजात कायदेशीरदृष्ट्या कोणतीही अडचण नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. ‘कंपनीकडून कोणतेही प्रदूषण झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही; मात्र सध्याच्या घडीला कोणतेही प्रदूषण आढळलेले नाही,’ असेही ते म्हणाले.
या औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. उद्योजकांची विशेष बैठक घेऊन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. आमच्या सर्व यंत्रणा जागतिक दर्जाच्या आहेत. इटलीत घडलेली घटना जाणीवपूर्वक झाली असून, तिची पार्श्वभूमी वेगळी आहे, असेही ते म्हणाले.