युद्धाचा परिणाम; सिलिंडरअभावी गणपतीपुळेत लाडू प्रसाद बंद, पर्यटनाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:52 IST2026-03-13T13:47:50+5:302026-03-13T13:52:13+5:30

दुपारचा खिचडी प्रसाद व संध्याकाळचा पुलाव प्रसाद सुरु, पण...

Laddu Prasad closed in Ganpatipule due to lack of cylinders | युद्धाचा परिणाम; सिलिंडरअभावी गणपतीपुळेत लाडू प्रसाद बंद, पर्यटनाला फटका

युद्धाचा परिणाम; सिलिंडरअभावी गणपतीपुळेत लाडू प्रसाद बंद, पर्यटनाला फटका

गणपतीपुळे (जि.रत्नागिरी) : युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या कमतरतेचा फटका वेगवेगळ्या हॉटेल्ससह सुप्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानलाही बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने श्री देव गणपतीपुळे संस्थानमार्फत भक्तांना दिला जाणारा लाडू प्रसाद तात्पुरता बंद करण्यात आला असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले.

भाविकांना दिला जाणारा दुपारचा खिचडी प्रसाद व संध्याकाळचा पुलाव प्रसाद चालू असला, तरी गॅसपुरवठा सुरळीत न झाल्यास तोही बंद होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका गॅस सिलिंडर्सना चांगलाच बसला आहे. सद्यस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरू असला, तरी व्यावसायिक सिलिंडर्सचा पुरवठा मात्र सुरळीत नाही. त्याचा फटका गणपतीपुळे पर्यटन क्षेत्राला बसला आहे.

राज्यभरातून सतत हजारो भाविक भेट देत असलेल्या गणपतीपुळे देवस्थानातील लाडू प्रसाद बंद करण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकंसाठी महाप्रसाद म्हणून खिचडीची व्यवस्था केली जाते. सध्या तरी ती सुरू आहे. मात्र, सिलिंडर पुरवठा सुरळीत न झाल्यास महाप्रसादही बंद करण्याची वेळ येणार आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवसाला हजारो पर्यटक भेट देतात. येथील हॉटेल सध्या तरी सुरू असून, आलेल्या पर्यटक व भाविकांना कोणत्याही गैरसोयीला तोंड द्यावे लागणार नाही. येथे येणारे भक्त व पर्यटकांची खाण्यापिण्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात येईल, असे येथील हॉटेल्स व पर्यटक व्यवसायिकांनी सांगितले.

Web Title: Laddu Prasad closed in Ganpatipule due to lack of cylinders