विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून एका महिन्यात २.३३ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:18 IST2025-12-11T16:17:25+5:302025-12-11T16:18:45+5:30
अकरा महिन्यांत २,९०,७८६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १७.८३ कोटींचा दंड

संग्रहित छाया
रत्नागिरी : कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केल्या आहेत आणि विनातिकीट प्रवाशांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये, कोकण रेल्वेने १,०७० विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवल्या. यात ४२,९६५ अनधिकृत-अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून भाडे आणि दंड म्हणून एकूण २.३३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
सुरक्षित आणि जबाबदार प्रवासावर लक्ष केंद्रित करत, कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणी मोहिमांची वारंवारता वाढवली आहे. या प्रयत्नांचे उद्दिष्ट तिकीटविरहित प्रवासाला आळा घालणे आणि अधिकृत प्रवाशांसाठी सुरळीत, आरामदायी प्रवास सुनिश्चित करणे आहे, हे आहे.
नोव्हेंबर २०२५ या महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने धडक कारवाई केली. या महिन्यात कोकण रेल्वेने १,०७० विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवल्या. यावेळी ४२,९६५ अनधिकृत -अनियमित प्रवासी आढळले. भाडे आणि दंड म्हणून या प्रवाशांकडून एकूण २.३३ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत, एकूण ७,४८३ विशेष मोहीम राबवण्यात आल्या, ज्यामध्ये २,९०,७८६ अनधिकृत/अनियमित प्रवासी आढळले. या कालावधीत देय रेल्वे भाडे आणि दंड म्हणून १७.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
तिकीट तपासणी तीव्र हाेणार
प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करण्याचे आवाहन काेकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. सर्व अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काेकण रेल्वे हिवाळा आणि ख्रिसमसच्या सणांच्या काळात त्यांच्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम तीव्र करणार आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.