काजू उत्पादनावर कोकण क्रांती करू शकतो : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:54 IST2025-05-13T18:54:01+5:302025-05-13T18:54:45+5:30

रत्नागिरी : ब्राझीलप्रमाणे कोकणही काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, असे प्रतिपादन ...

Konkan can revolutionize cashew production says minister Uday Samant | काजू उत्पादनावर कोकण क्रांती करू शकतो : उदय सामंत

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करू शकतो : उदय सामंत

रत्नागिरी : ब्राझीलप्रमाणे कोकणही काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रीउदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीत सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरीच्या हापूसची आंतरराष्ट्रीय दर्जावर विक्री होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगातील विविध पिकांच्या लागवडीकडे वळले पाहिजे. भात, नाचणी, फळबागांचे लागवड क्षेत्र वाढले पाहिजे. नोकरीपेक्षा १० पट पैसे हे शेतीमधून मिळवू शकतो. त्यासाठी शेती वाढविली पाहिजे. निसर्ग सुधारायचा असेल आणि प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा असेल तर बांबू लागवडीला पर्याय नाही. पुढील कृषी प्रदर्शन हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे असेल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.

मंत्री भरत गोगावले म्हणाले की, फळबाग लागवडीसाठी १०० टक्के फलोत्पादन योजना सुरू करणारा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाईल. फळबाग वाढीसाठीचे यंदाचे १९०० हेक्टर उद्दिष्ट पूर्ण करावे, म्हणजे मुंबईत होणारे स्थलांतर थांबेल. शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री योगेश कदम म्हणाले की, शेती हा व्यवसाय म्हणून उदयास येत असून, तो विकसित होत आहे. शेतीपूरक व्यवसाय वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे पूर्ण करून पाणी अडवण्याची मोहीमही राबवावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यावेळी स्वागत व प्रास्ताविक केले.

Web Title: Konkan can revolutionize cashew production says minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.