जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांची बदली, राकेश जंगम खून प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:51 IST2025-09-19T15:51:46+5:302025-09-19T15:51:58+5:30
रत्नागिरी : राकेश जंगम बेपत्ता आणि खून प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर ठेवण्यात ...

जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांची बदली, राकेश जंगम खून प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका
रत्नागिरी : राकेश जंगम बेपत्ता आणि खून प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकाराची पाेलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून, कुलदीप पाटील यांची तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांनी कुलदीप पाटील यांची बदली केली आहे. तसेच या संपूर्ण तपासाची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे दिली आहे.
तपासातून उघडकीस आले की, ६ जून २०२४ रोजी राकेश जंगम याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत कबुली दिली. त्याच्यासोबत विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांचीही नावे समोर आली. राकेश जंगम हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २१ जून २०२४ रोजी राकेशच्या आईने जयगड पोलिस स्थानकात ताे बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती.
संपूर्ण वर्षभर शोधमोहीम राबवूनही जयगड पोलिसांना राकेशचा शाेध घेता आला नाही. त्याचदरम्यान मिरजोळे येथील भक्ती मयेकर खून प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि त्यातूनच राकेशच्या खुनाचा धागा मिळाला. या विलंबामुळे जयगड पोलिस स्थानकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटे यांनी कुलदीप पाटील यांची बदली केली.