हिंदू समाजाला संरक्षण देणे हेही माझेच काम : मंत्री नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:44 IST2025-02-10T16:44:27+5:302025-02-10T16:44:47+5:30
'माझ्यावर दबाव टाकणारा इथे कोणी नाही'

हिंदू समाजाला संरक्षण देणे हेही माझेच काम : मंत्री नितेश राणे
रत्नागिरी : आता पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे. त्याला हिंदुत्ववादी विचारांची जोड द्या. मी हिंदुत्ववादी आहे. हिंदू समाज माझ्यासाठी केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना हिंदू समाजाला संरक्षण देणे हेही माझं काम आहे. त्यासाठीच हिंदुत्ववादी विचारांची जोड देत संघटन भक्कम करूया, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री तथा भाजपाचे रत्नागिरी संपर्कमंत्री नितेश राणे यांनी केले.
रत्नागिरीच्या संपर्कमंत्री पदाची जबाबदारी भाजपाने दिल्यानंतर मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरीत पहिला संपर्क मेळावा झाला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, ज्येष्ठ नेते बाबा परुळेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
मंत्री राणे म्हणाले की, इथे पक्ष ताकदीने वाढावा, यासाठी प्रत्येक आठवड्यात या जिल्ह्यात येणार आहे. कार्यालयात बसून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये आपली माणसं कशी दिसतील, यासाठी आग्रह धरणार आहे. ज्या परिस्थितीत तुम्ही काम करता ते बघता तुमचं कौतुक केलंच पाहिजे. मात्र, आता पक्षाने बळ दिल्यावर जोमानं कामाला लागा. सभासद नोंदणीकडे लक्ष द्या. जिल्हा परिषद गटनिहाय दौरा करू. जिथे आपला सरपंच आहे तिथे त्यांना निधी देऊ.
माझ्यावर दबाव टाकणारा इथे कोणी नाही
येणारा काळ हा शत प्रतिशत भाजपाचा काळ आहे. प्रशासनात जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. बदल नक्की घडवू. माझ्यावर दबाव टाकणारा इथे कोणी नाही. माझ्यासाठी भाजपा, भाजपाचे संघटन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता एकत्र काम करूया आणि या जिल्ह्यात भाजपा हाच एक नंबरचा पक्ष असेल इतके सक्षम होऊया, असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.