रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:45 IST2025-01-06T18:44:15+5:302025-01-06T18:45:22+5:30
पदाधिकाऱ्यांमधील ताळमेळ विस्कळीत

रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’
रत्नागिरी : शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजी अजूनही शमलेली नसून गटबाजी जाेर धरत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली धुसफूस अजूनही संपलेली नसल्याने पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे. पक्षातील या अंतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळेच काहींनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च २००६ मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. मात्र, गेल्या १८ वर्षांत पक्षाने भरारी घेण्याऐवजी पक्षाला गळतीच अधिक लागली आहे. पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणारे अनेक जुने-जाणते पक्षापासून दूर झाले आहेत. त्यातच रत्नागिरी शहरात अंतर्गत गटबाजीमुळे काेणाशी काेणाचे पटत नसल्याचे समाेर येत आहे. त्यामुळेच रत्नागिरीत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना माेजकेच पदाधिकारी उपस्थित राहत आहेत.
पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याेग्य ताळमेळ नसल्याने पक्षातील अनेकांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांचा आधार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत तर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या माेजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाढ खुंटली आहे.
राज्य सरचिटणीसांचे दुर्लक्ष
खेड येथील वैभव खेडेकर राज्य सरचिटणीस म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, उत्तर रत्नागिरी वगळता त्यांनी जिल्ह्यातील अन्य भागात पक्षवाढीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांमध्ये पक्ष वाढ खुंटली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीवरही त्यांनी ‘उतारा’ काढलेला नाही.
एकमेकांकडे पाठ
रत्नागिरी शहरातील काही सामाजिक प्रश्न हाताळून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लढ्यात तालुका किंवा शहरातील पदाधिकारी काेठेच दिसत नाहीत. त्यातच शहराध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर तालुकाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर जिल्हाध्यक्ष नाहीत, अशीच स्थिती आहे.
तालुकाध्यक्ष दूरच
काही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला हाेता. पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप त्यांनी केला हाेता. या घटनेनंतर तालुकाध्यक्ष पक्षापासून दूरच राहिले आहेत.