corona virus Ratnagiri updates : मार्च महिन्यात शिमगोत्सवामुळे रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 03:45 PM2021-04-02T15:45:27+5:302021-04-02T15:50:30+5:30

Coronavirus Ratnagiri Updates- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असून, लसीकरणावरही भर दिला आहे. मात्र, सध्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने या लोकांपासून अन्य लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.

Increased risk of infection from asymptomatic patients | corona virus Ratnagiri updates : मार्च महिन्यात शिमगोत्सवामुळे रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

corona virus Ratnagiri updates : मार्च महिन्यात शिमगोत्सवामुळे रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

Next
ठळक मुद्दे त्रासदायक नसलेले रूग्णच ठरत आहेत सर्वाधिक त्रास देणारे मार्च महिन्यात शिमगोत्सवामुळे रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढविली असून, लसीकरणावरही भर दिला आहे. मात्र, सध्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने या लोकांपासून अन्य लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांकडून योग्यरीत्या खबरदारी घेतली जात होती. कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर यांचे पालन योग्यरित्या केले जात होते. तसेच संचारबंदी सुरू असल्याने लोकांची गर्दीही थांबली होती. मात्र, मे महिन्यात लॉकडाऊन शिथील होताच मुंबईहून मोठ्या संख्येने आलेल्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले.

यावेळी ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती अशांकडून संसर्ग झाल्याने स्थानिक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली. आरोग्य यंत्रणेच्या अथक सेवेमुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत तसेच कोरोनाने मृत्यू होण्याच्या घटनेत घट होऊ लागली.

मात्र, डिसेंबर महिन्यात लॉकडाऊन पूर्णपणे शिथील झाल्याने लोकांना कोरोना गेला असे वाटले. त्यामुळे त्यांच्यात बेफिकिरी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढावी, यासाठी शासनाने १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू केले आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोना लस घेण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे.

त्यातच आता पुन्हा शिमग्यासाठी कोकणात आलेल्या मुंबइकरांमुळे पुन्हा गेल्या वर्षीच्या कोरोना स्थितीची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. कोरोनाच्या या बदलत्या रूपात सौम्य परिणाम असले तरी संसर्ग अधिक प्रमाणात होत आहे. त्यातच ज्यांच्यात अजिबातच लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचा संचार सर्वत्र होत आहे. अशा व्यक्तींमध्ये लक्षणे नसली तरी हे रुग्ण अनेकांना बाधित करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जलदगतीने फैलावत आहे.

ज्या व्यक्तींना त्रास होतो, त्या व्यक्ती उपचारासाठी पर्यायाने चाचणीसाठी येत आहेत. मात्र, ज्यांच्यात लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींची चाचणी होत नाही. ते कसलीही शंका नसल्याने फिरत राहतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावेळी कोरोनाचा संसर्ग अधिक जलदगतीने होताना दिसत आहे.

अहवालाआधीच बाहेर

लोक त्रास झाल्याशिवाय कोरोना चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. चाचणीनंतर त्याचा अहवाल येईपर्यंत त्या व्यक्तीने विलगीकरणात राहणे गरजेचे असते. मात्र, चाचणी दिल्यानंतर अहवालाची प्रतीक्षा न करता अनेक व्यक्ती इतरत्र फिरत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे.

छुपे कोरोनावाहक

लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून घरातील व्यक्ती कोरोनाबाधित होत आहेत. त्यांना त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करून त्यांची चाचणी केली जाते. ते पॉझिटिव्ह आले तरच घरातील सर्वांची चाचणी घेण्यात येते. तोपर्यंत काही दिवस उलटून गेल्याने लक्षणे नसलेल्या व्यक्तीचा अहवालही निगेटिव्ह येतो. मात्र, या काळात या व्यक्तीकडून अनेक व्यक्तींना संसर्ग होतो.


रॅपिड ॲंटिजेन चाचणी अहवालाची विश्वासार्हता ३० टक्के आहे. मात्र, स्वॅब चाचणी खात्रीशीर असल्याने जिल्हा रुग्णालयात या चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. मात्र, ज्यांना त्रास होतो, अशाच व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, ज्यांना लक्षणे नाहीत, अशा व्यक्ती चाचण्यांसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे याच व्यक्तींकडून घरातील गंभीर आजारांचे रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित होत आहेत. या लोकांनी जबाबदारीने वागून कोरोना नियमांचे पालन करायला हवे.
- डॉ. संघमित्रा फुले - गावडे,
जिल्हा शल्य चिकीत्सक, रत्नागिरी

Web Title: Increased risk of infection from asymptomatic patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.