मी तुमच्यावर, तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही : सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:36 IST2020-10-13T13:33:06+5:302020-10-13T13:36:30+5:30
sunil tatkare, Bhaskar Jadhav, Ratnagiri यापुढे मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही. हे दोघांनी कायम जपायचे, असा शब्द खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी चिपळूण येथे दिला.

मी तुमच्यावर, तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही : सुनील तटकरे
चिपळूण : यापुढे मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही. हे दोघांनी कायम जपायचे, असा शब्द खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी चिपळूण येथे दिला.
कामथे उपजिल्हा रूग्णालयात ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणालीचा शुभारंभ खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्ताने तटकरे व जाधव हे अनेक वर्षांनी एका व्यासपीठावर आले होते.
यावेळी जाधव यांच्या हस्ते तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जाधव यांनी तटकरे माझ्यावर टोलेबाजी करतीलच पण त्यांच्याकडे यानिमित्ताने एकच मागणी करेन की, जसे खेडवर प्रेम दाखवून कार्डिया रुग्णवाहिका दिली, तशीच रुग्णवाहिका चिपळूणलाही द्यावी. चिपळूणनेही त्यांना खूप काही दिले आहे, अशी विनोदी शैलीत जाणीव करून दिली.
त्यावर तटकरे यांनी आपल्या भाषणात जाधव यांची मागणी लवकरच पूर्ण होईल, असे सांगताना मी त्यांच्यावर टोलेबाजी करणार नाही. कारण जाधव यांची राजकीय वाटचाल २५ वर्षे पाहिली आहे. उलट त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टोलेबाजी करण्याचा प्रश्नच येत नाही.
यावर जाधव यांनी तटकरे यांना रोखत यापुढे मीही तुमच्यावर टोलेबाजी करणार नाही. तुम्ही ते जपा असे स्पष्ट केले. त्यावर तितक्याच हजरजबाबीपणे तटकरे यांनी मी तो शब्द पाळेन, पण तुमचा भरोसा मला नाही, असे स्पष्ट करताच कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदी उपस्थित होते.