मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:32 IST2022-07-09T19:31:46+5:302022-07-09T19:32:43+5:30
अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले.

मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं
खेड : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले. त्यामुळेच शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट मत आमदार योगेश कदम यांनी खेड येथे पत्रकार परिषदेत मांडले. मात्र, मी पळून गेलो नाही तर आदित्य ठाकरे यांना फोन करून मगच गुवाहाटीला गेलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटात सामील झाल्यानंतर आमदार याेगेश कदम प्रथमच शनिवारी खेडमध्ये दाखल झाले हाेते. खेड शहरातील योगिता डेंटल कॉलेज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी आजही शिवसैनिकच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे माझे आजही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु, तत्कालीन पालकमंत्री अनिल परब आणि पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असणाऱ्या चौकडीमुळे मला हा निर्णय घेणे भाग पडले.
दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच तालुकाप्रमुखांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली. शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला डावलून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांकडे आणि नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवडणुकीची सुत्रे दिली.
राष्ट्रवादीकडून त्यांच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांना देण्यात येणारे बळ, त्यामुळे शिवसैनिकावर होणारा अन्याय वेळोवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, स्थानिक नेतृत्व खासदार विनायक राऊत यांच्या कानावर घालूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मी शिवसेना म्हणूनच पुढील निवडणूक लढणार व जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासमवेत तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, खेड पंचायत समितीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड नगरपरिषदेचे निवडक माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.