पावसामुळे नौका पुन्हा बंदरातच उभ्या, मच्छिमारांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:21 IST2022-10-10T13:20:53+5:302022-10-10T13:21:19+5:30
यंदाच्या हंगामात मासेमारी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला

पावसामुळे नौका पुन्हा बंदरातच उभ्या, मच्छिमारांना फटका
रत्नागिरी : मुसळधार पावसासह वादळी वारे वाहू लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे अनेक नौका बंदरांमध्ये नांगरावर उभ्या असून, मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी- वाऱ्यासह समुद्र खवळलेला असतानाच मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्याचा परिणाम खोल समुद्रातील मासेमारीवर झाला आहे. आधीच समुद्रात जाऊनही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत. आता वादळी- वाऱ्यामुळे मासेमारीच ठप्प आहे. नौका बंदरात उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदाच्या हंगामात मासेमारी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे.
बदललेल्या वातावरणामुळे मासेमारी नौका समुद्रात न गेल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. मासळी बाजारामध्ये माशांचे प्रमाण कमी झाले आहे. मासे मिळत नसल्याने माशांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.