आंब्यावर उष्माघाताचा आघात, आंबे खराब होऊन गळू लागले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:29 IST2023-04-03T14:28:48+5:302023-04-03T14:29:08+5:30

मे महिन्यात आंब्याची कमतरता भासणार

Heat stroke on mangoes, mangoes start to rot and fall off | आंब्यावर उष्माघाताचा आघात, आंबे खराब होऊन गळू लागले 

आंब्यावर उष्माघाताचा आघात, आंबे खराब होऊन गळू लागले 

रत्नागिरी : हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. कोकणात तापमानवाढीमुळे झालेल्या उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळे गळ माेठ्या प्रमाणात हाेत असून, बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.

लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला. त्यानंतरही या मोहरावर थ्रीप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूस हाताशी लागेल अशी आशा बागायतदारांची होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढला असून, त्याचा परिणाम आता हापूसवर जाणवत आहे.

सध्या झालेल्या फळधारणापैकी जवळपास ७५ टक्के हापूस हा गळून पडत आहे. त्यामुळे बागायतदारांचा यंदाचा हंगाम आर्थिक कसरतीचा ठरण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याला फटका बसत आहे. रोगामुळे नाइलाजाने औषधांची फवारणी करावी लागते. मार्चमध्ये असलेला आंबा जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या १० तारखेपर्यंत मिळेल.

त्यानंतर आणि मे महिन्यात आंब्याची कमतरता भासेल. शेवटच्या मोहरावर अपेक्षा होत्या. मात्र, त्यावरही वातावरण बदलाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाढत्या उष्णतेने वाया जाईल का, असा प्रश्न बागायतदारांसमाेर आता उभा राहिला आहे.

Web Title: Heat stroke on mangoes, mangoes start to rot and fall off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.