Ajit Pawar: चिमुकल्यांच्या प्रश्नांनी अजित दादांना आठवले बालपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:01 IST2022-04-26T15:26:11+5:302022-04-26T16:01:57+5:30
चहापान घेताना अजित पवार यांना दोन चिमुकल्या अन्नदा डांबरे व रेहा राजेशिर्के यांनी गाठले आणि एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्या चिमुकल्यांचे बोबडे बोल ऐकून चक्क अजित पवारही रमून गेले.

Ajit Pawar: चिमुकल्यांच्या प्रश्नांनी अजित दादांना आठवले बालपण
चिपळूण : अजित पवार म्हटले की, आपल्याला आठवते ते त्यांचे आक्रमक रूप, करारी आवाज आणि बोलायला फटकळ... परंतु, अजित पवार यांचा मृदू स्वभाव दोन चिमुकल्यांनी अगदी जवळून अनुभवला. एवढेच नव्हे तर त्या चिमुकल्यांच्या प्रश्नांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चक्क आपले बालपण आठवले.
चिपळुणातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते-दहिवली येथील कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात स्व.गोविंदराव निकम यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त चहापान घेताना अजित पवार यांना दोन चिमुकल्या अन्नदा डांबरे व रेहा राजेशिर्के यांनी गाठले आणि एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्या चिमुकल्यांचे बोबडे बोल ऐकून चक्क अजित पवारही रमून गेले.
या चिमुकल्यांनी अजित पवार यांचे कोकणात स्वागत करतानाच ‘‘दादा, आम्ही सकाळी शाळेत जाण्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कसे पोहाेचता’’, असा प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नावर पवार यांनी तितक्याच गोड भाषेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, या सर्व गोष्टी आम्ही शरद पवार यांच्यामुळे शिकलो. ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा आम्ही लहान होतो. त्यांच्या दिनक्रमातून आम्ही खूप काही शिकलो.
ते सकाळी उठतात कितीला, कामाला सुरुवात करतात कधी, कशाप्रकारे लोकांना भेटतात व त्यांची कामे करतात, रात्री झोपतात कधी, तेव्हा आम्हाला समजले की, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सकाळी ७ वाजल्यापासून कामाला सुरुवात करायचे. संपूर्ण महाराष्ट्रातील लोक त्यांच्याकडे येतात. त्या सर्वांना ते न थकता भेटी देतात. त्यांची ती सवय आम्ही अवलंबली. मंत्रालयात दूरहून काही लोक येत असतात. त्यांच्या काही अडचणी असतात. तेव्हा मंत्रालयात कोणी तरी असले पाहिजे, या भावनेतून आम्ही लवकर कामाला सुरुवात करतो, त्या कामातून वेगळं समाधान मिळते, असे पवार यांनी सांगितले.
त्यांचे हे बोलणे संपताच त्या चिमुकल्यांनी दुसरा प्रश्न विचारला की, दादा राजकारण सोडून तुमचा आवडता खेळ कोणता? तेव्हा चक्क पवार यांना बालपणच आठवले. क्रिकेट हा सर्वात आवडता खेळ असला तरी, लहानपणी पत्ते, गोट्या आणि विटीदांडूचा खेळही खेळलो आहे, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला.