रत्नागिरीत आढळली ‘जायंट आफ्रिकन गोगलगाय’; दूषित स्त्रावामुळे संक्रमणाचा धाेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:07 IST2025-11-10T16:07:14+5:302025-11-10T16:07:33+5:30
मनुष्य, पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

रत्नागिरीत आढळली ‘जायंट आफ्रिकन गोगलगाय’; दूषित स्त्रावामुळे संक्रमणाचा धाेका
रत्नागिरी : शहरातील आकाशवाणी केंद्राच्या संरक्षक भिंतीवर ‘जायंट आफ्रिकन स्नेल’ अर्थात् गोगलगाय आढळली आहे. हा परदेशी प्रजातीचा शंखप्राणी असून, रत्नागिरीमध्ये प्रथमच दिसला आहे. पर्यावरणातील बदलामुळे हा प्राणी येथे आढळल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व रत्नागिरीतील दापोली येथे या प्रजातीचा शंखप्राणी सापडला होता.
‘जायंट आफ्रिकन स्नेल’ या गोगलगायीचे शरीर लांबट असते. अंगावर तपकिरी पट्टेदार कवच असून, लांबी १० ते २० सेंटीमीटर आहे. ही गाेगलगाय मुख्यत: वनस्पतींच्या हिरव्या भागांवर उपजीविका करते आणि त्यामुळे शेती, पिकांचे नुकसान होते. गोगलगाय रोगकारक जंतू वाहून नेत असल्यामुळे मनुष्य व पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर तिचा परिणाम होऊ शकतो.
दूषित स्त्रावामुळे संक्रमणाचा धाेका
या गोगलगायीचे वैशिष्ट्य म्हणजे अँजिओस्ट्राँगिलस कॅन्टोनेन्सिस नावाच्या परजीवी कृमीचा वाहक असू शकतो. हा परजीवी मानवाच्या शरीरात गेल्यास मेंदूज्वरासारखा आजार होऊ शकतो. संक्रमित शंखप्राणी हाताळताना किंवा त्याच्याशी थेट संपर्क आल्यास दूषित स्रावामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे या गाेगलगायीला हात लावू नये, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे.
पर्यावरण संतुलनावर परिणाम होण्याचा धोका
- भारतामध्ये ‘अचाटिना फुलिका’चा प्रसार २०व्या शतकात सुरुवातीपासून नोंदविला गेला आहे. ही प्रजाती दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, गोवा व महाराष्ट्राच्या काही भागांत आढळली होती.
- ही प्रजाती स्थानिक जैवविविधतेस धोका निर्माण करतात. स्थानिक गोगलगायी किंवा सूक्ष्मजीवांच्या अधिवासावर हल्ला करतात. यामुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होण्याचा धोका आहे.
‘जायंट आफ्रिकन स्नेल’ या शंखप्राण्याचे शास्त्रीय नाव ‘अचाटिना फुलिका’असे आहे. ही प्रजाती मूळची पूर्व आफ्रिकेतील असून, उष्ण व ओलसर दमट हवामानात अत्यंत वेगाने वाढते आणि झपाट्याने प्रजनन करते. रत्नागिरीमध्ये दमट किनारी भागातील हवामान या प्रजातीच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने तिचे संक्रमण झपाट्याने होण्याची शक्यता आहे. - प्रा. डाॅ. मधुरा मुकादम, प्राणीशास्त्र विभाग, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी