गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या सांगलीतील तरुणाला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:33 IST2025-11-06T14:33:12+5:302025-11-06T14:33:29+5:30
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवाळी पर्यटन हंगामात दोघे जण समुद्रात बुडाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी ...

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या सांगलीतील तरुणाला वाचवले
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवाळी पर्यटन हंगामात दोघे जण समुद्रात बुडाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी खानापूर (ता. विटा, जि. सांगली) येथील २५ वर्षीय तरुणाला समुद्रात बुडताना वाचविण्यात यश आल्याची माहिती समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांकडून देण्यात आली. शशांक धीरेंद्र कुलकर्णी असे वाचविण्यात आलेला या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खानापूर येथील सहा तरुण मित्र देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. सर्व जण समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यातील शशांक कुलकर्णी हा समुद्राच्या खोल पाण्यात गेल्यानंतर अडकला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांचे कर्मचारी आपल्या जेस्की बोटीने तत्काळ संबंधित तरुण बुडत असलेल्या दिशेने धावले. खोल पाण्यात बुडत असलेल्या शशांकला त्यांनी सुखरूपरीत्या पाण्याबाहेर आणले.
मोरया वॉटर स्पोर्टचे कर्मचारी कैलास किशोर शितप आणि आरिफुल यांनी धाडसाने शशांकचे प्राण वाचवले. त्यांना गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक यांची मोलाची मदत प्राप्त झाली. या घटनेची माहिती मिळताच मालगुंड गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीची माहिती देण्यात आली तसेच कोणीही खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
पोलिसांसह गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थान सुरक्षारक्षक आणि स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्याकडून वारंवार पर्यटकांना सूचना दिल्या जात आहेत. परंतु, तरीही पर्यटकांकडून अतिउत्साहीपणा आणि बेजबाबदारपणा दाखविला जात आहे.